घरचा अभ्यास म्हणजेच होमवर्क म्हटलं की आजही आपल्या कपाळावर आठ्या येतात. अनेकदा अभ्यास करता करता झोप येणारेही अनेक आहेत. लहानपणीचे किस्से असो किंवा इंटरनेटवरील व्हिडीओ असो अभ्यास आणि झोप या दोघांमध्ये काहीतरी खास नातं असल्याचं वाटण्याइतपत या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मात्र अशाप्रकारे अभ्यास करताना झोपणं एका मुलाला चांगलच महागात पडलं आहे.

घटना आहे तैवानमधली. अभ्यास करताना एका मुलाला एवढी झोप लागली की आपण वह्यापुस्तकांवर झोपताना आपल्या गालाखाली पाल दाबली गेल्याचा त्याला अंदाजही नाही आला. तुम्हाला वाचून विचित्र वाटेल मात्र सध्या या मुलाच्या गालावर उमटलेला पालीच्या आकाराचा ठसा सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरतोय.

 या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती ट्विटरवर पोस्ट करण्यात आली असून त्यासोबत दोन फोटोही पोस्ट करण्यात आले. हा मुलगा वह्यापुस्तकांवरील ज्या पालीवर झोपला ती पाल मेलेल्या स्थितीमध्ये पडल्याचे एका फोटोत दिसत आहे. हा पोरगा या पालीवर डोकं ठेवून एवढा गाढ झोपला होता की त्याच्या गालावर पालीच्या आकाराचा ठसा उमटला. दुसरा फोटो या मुलाच्या गालावर उमटलेल्या या पालीच्या आकाराच्या ठशाचा आहे. हे फोटो ट्विटरवर जॅक्सन लू नावाच्या व्यक्तीने शेअर केले आहेत. चायनीज भाषेमध्ये या फोटोला कॅप्शन देताना, “जेव्हा तुम्ही अभ्यास करताना झोपी जाता तेव्हा तुम्हाला कसलीच चिंता नसते. अगदी तुम्ही मेलेल्या पालीवर झोपलात तरी त्याची तुम्हाला जाणीव होत नाही,” असं म्हटलं आहे.

मागील दोन आठवड्यांमध्ये पाच हजार ६०० हून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं असून साडेसहा हजारहून अधिक जणांनी ते लाईक केलं आहे.

अनेकांनी हा फोटो खूपच विचित्र असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अशा गोष्टी करण्यापेक्षा आपण मृत्यूला कवटाळू असंही काहीजणांनी म्हटलं आहे. अनेकांनी या मुलाला झोपता त्याच्या गालाच्या आणि वहीच्यामध्ये पाल आल्याचं कसं समजलं नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींनी ही पाल मुलाच्या गालाखाली दाबली गेल्याने मेली असावी अशी शंकाही व्यक्त केलीय. या फोटोच्या सत्यतेसंदर्भात काहींनी शंका उपस्थित केली असली तरी हा फोटो चर्चेचा विषय ठरतोय हे मात्र नक्की.