नोटाबंदीच्या निर्णयानंतर झालेला चलनकल्लोळ आठवडा उलटून गेला तरी थांबला नाही. अनेकांच्या दिवसांची सुरूवातच बँकेच्या दारी रांगा लावण्यापासून होत आहेत. एटीएमच्या बाहेरची परिस्थिती काही वेगळी नाही. ५०० आणि २००० च्या नव्या नोटा चलनातही आल्या. तीन चार तास खर्च करून जून्या नोटा बदलून जेव्हा नव्या दोन हजारांच्या नोटा हातात आल्या तेव्हा अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कित्येकांनी तर या नोटेसोबत सेल्फी काढून ते सोशल मीडियावर अपलोडही केले. पण हा सारा आनंद क्षणिक ठरला कारण २००० हजारांचे सुटेच मुळात उपलब्ध नव्हते. आधीच सुट्या पैशांचा तुटवडा, कोणाकोणाला आणि किती सुटे पैसे देणार असा प्रश्न बँकेपासून ते सर्वसामान्य दुकानदारांना देखील पडला आहे. त्यामुळे खिशात दोन हजारांची नोट असूनही तिचा उपयोग मात्र शून्यच आहे. त्यामुळे आता ‘कुणी सुटे देता का सुटे ?’ असे ओरडण्याची वेळ सामान्य माणसांवर आली आहे. तेव्हा नाराज झालेल्या नागरिकांनी आता व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे.

मोदी सोशल मीडियावर सक्रिय असतात. तेव्हा किमान यावरून तरी त्यांना सर्वसामान्यांच्या समस्या समजतील अशी भाबडी आशा सामान्यांची आहे. त्यामुळे ‘#छुट्टा_दे_दे_रे_मोदी हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आहे. २००० ची नवी नोट आली पण आता सुटे देण्याची सोय तरी करा असे  गा-हाणे मोदी सरकारला ट्विटरवर नेटीझन्स घालत आहे. अनेकांना दुकानदार सुट्यांच्या अभावी परत पाठवत आहेत त्यामुळे या ना त्या कारणांनी सामान्यांनी होण-या गैरसोयीबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.