देशामधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या भागांना सील करण्यात येत आहे. शक्य त्या सर्व मार्गांनी करोनाचा फैलाव थांबवण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र असत असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्याही जास्तच आहे. असा लोकांवर पोलीस कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरीही रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी होतानाचे चित्र दिसत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवरुन घरीच थांबा हा संदेश अगदी हटके पद्धतीने देण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांच्या आणि तरुणांच्या आवडत्या कार्यक्रमांचा आधार घेत घरीच थांबण्याचे आवाहन करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनी आता आपला मोर्चा मराठी चित्रपटांकडे वळवल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय माने आणि ‘दुनियादारी’मधील दिग्या आणि श्रेयसची मदत घेतल्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी थेट अशोक मामा आणि नाळमधील चैत्याची मदत घेतली आहे. या दोघांचा एक मजेदार फोटो ट्विट करत पोलिसांनी तुम्हीच तुमच्या सिनेमाचे हिरो व्हा असं सांगत घरातच थांबण्याचे आवाहन केलं आहे.

‘दोघेही आपापल्या सिनेमांचे हिरो आहेत. तुम्ही तुमच्या सिनेमाचे व्हा- जी काही ‘गम्मत जम्मत’ आहे ती लॉकडाऊन संपल्यावर करा,’ अशी कॅप्शन देत महाराष्ट्र पोलिसांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील ‘अश्वीनी ये ना’ या गाण्यातील ‘ये ना प्रिये’ हे शब्द लिहिलेला अशोक सराफ यांचा उदास चेहरा दाखवला आहे. तर बाजूला ‘नाळ’मधील श्रीनिवास पोकळे म्हणजेच चैतन्यचा फोटो बाजूला दिसत असून त्यावर ‘मी येतच नाही’ असे शब्द लिहिलेले आहेत.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस अगदी मजेदार पद्धतीने नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. यासाठी त्यांनी अगदी ‘नेटफ्लिक्स’वरील ‘थर्टी रिझन्स व्हाय’, ‘मनी हाइस्ट’ सारख्या सिरीजचे मिम्सही शेअर केले होते.