प्री वेडिंग फोटोशूट हल्ली जरूरीचं असल्यासारखंच झालं आहे. प्रत्येक जोडपं वेगवेगळ्या आयडिया आणि थीम घेऊन प्री वेडिंग शूट करतात. पण, केरळमधील एका जोडप्यानं देशभरात चर्चेला असलेल्या विषयालाच प्री वेडिंग शूटमध्ये आणलं आहे. या जोडप्याचे फोटो सगळीकडं व्हायरल झाले असून, त्यांच्या या कल्पनेला नेटकऱ्यांकडून चांगलीच दाद मिळत आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (NRC) प्रक्रियेविरोधात देशभरात आंदोलनं केली जात आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात होत असलेल्या आंदोलनांत हिंसक घटनाही घडत असून, परिस्थिती चिघळत आहेत. त्यामुळे शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचं आवाहन राजकीय पक्ष आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून केलं जात आहे.

या सगळ्या आंदोलनांच्या कोलाहलात केरळमधील जोडप्यानं अनोख्या पद्धतीनं CAA आणि NRC या दोन्हींना विरोध केला आहे. केरळमधील जी. एल. अरूण गोपी आणि आशा शेखर यांचा नव्या वर्षात ३१ जानेवारी रोजी विवाह होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी प्री वेडिंग शूट केलं. जे आता सोशल मीडियावर तुफान हिट झाले आहेत. यामधील एका फोटोमध्ये त्यांनी NoCAA आणि NO NRC चा संदेश देणारे पोस्टर हाती घेतले आहेत. या जोडप्यांनी केलेल्या विरोधाच्या कल्पनेचं सोशल मीडियावर चांगलंच कौतूक होऊ लागलं आहे.

तिरुवनंतपूरम जिल्ह्यातील पोमुंदी हिल्स परिसरात हे शूट करण्यात आलं आहे. हा पहिल्यांदा त्यांच्या फोटोग्राफरनं १८ डिसेंबर रोजी फेसबुकवर शेअर केला. त्यानंतर तो फोटो फेसबुक, ट्विटर इन्स्टाग्रामवर अनेकांनी शेअर केला. याविषयी बोलताना फोटोग्राफर अर्जून म्हणाला, “हा फोटो देशभरात व्हायरल होईल असं वाटलं नव्हतं. अलीकडे अनेक जोडप्याचे फोटोशूट केले. पण, त्यावर अश्लाघ्य आणि टीका करणाऱ्यांच प्रतिक्रिया यायच्या. त्यामुळे वेगळी आयडिया घेऊन शूट करायचं ठरवलं. देशात सुरू असलेल्या CAA आणि NRC चा मुद्यावर शूट करायची कल्पना डोक्यात आली आणि ती जी. एल. अरुण गोपी आणि आशा यांना सांगितली,” असं अर्जून यांनं सांगितलं.