ऑनलाइन ऑर्डर केलेलं जेवण पोहोचवण्यासाठी मुस्लिम तरुण आल्याचं कारण देऊन दिलेली ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटो कंपनीने खडेबोल सुनावले आहेत.

झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर केल्यानंतर कंपनीकडून डिलिव्हरीसाठी मुस्लिम तरुणाला पाठवल्याचं समजताच एका हिंदू व्यक्तीने आपली ऑर्डर रद्द करण्याचा इशारा ट्विटरद्वारे झोमॅटोला दिला होता. त्यावर आम्ही डिलिव्हरी बॉय बदलणार नाही असं झोमॅटोने स्पष्ट केल्यानंतर या व्यक्तीने त्याची ऑर्डर रद्द केली आणि पुन्हा एकदा झोमॅटोला ट्विटरद्वारे मला माझे पैसे देखील परत नको पण मी ऑर्डर रद्द करत असल्याचं कळवलं. त्यावर झोमॅटोने भन्नाट उत्तर या व्यक्तीला दिलं असून नेटकऱ्यांना झोमॅटोने दिलेलं उत्तर चांगलंच भावलंय.


पंडीत अमित शुक्ला नावाच्या एका ट्विटर युजरने झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यानंतर झोमॅटोकडून आलेल्या मेसेजमध्ये जेवण पोहोचवण्यासाठी मुस्लिम तरुण येणार असल्याचं कळताच त्यांनी झोमॅटोकडे तक्रार केली आणि ऑर्डर रद्द केली. त्यावर झोमॅटोने ‘अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो’ अशा आशयाचं ट्विट केलं आणि या तरुणाची बोलतीच बंद केली.

झोमॅटोने दिलेलं हे उत्तर नेटकऱ्यांना देखील चांगलंच पसंतीस पडलं असून त्यासाठी झोमॅटोवर कौतुकाचा वर्षाव होतोय.