सन २०२० मध्ये आणखीन काय काय पहावं लागणार आहे हे वाक्य आतापर्यंत तुम्ही नक्कीच कुठे ना कुठे वाचलं किंवा ऐकलं असणार. खरोखरच मागील काही महिन्यांमध्ये अगदी महामारीच्या बातम्यांपासून ते अगदीच विचित्र पद्धतीच्या शेकडो बातम्या ऐकायला आणि वाचायला मिळाल्या आहेत. अगदी करोना असो किंवा लेबनॉनमधील विस्फोट असो किंवा अगदी कलाकारांच्या आत्महत्येपासून ते भूकंप आणि चक्रीवादळाच्या बातम्या असो हे वर्ष पूर्णपणे विचित्र बातम्यांचेच राहिले आहे असं म्हटलं जात आहे. असं असतानाच आणखीन एक विचित्र बातमी समोर आली असून ही बातमी वाचून तुम्ही नक्कीच खरोखर या वर्षी काहीही पाहायला मिळू शकतं असं म्हणाल. झालं असं की एक वयस्कर व्यक्ती रस्त्यावरुन जात असतानाच अचानक वरुन एक मांजर या व्यक्तीच्या डोक्यात पडली आणि या अनपेक्षित आघातामुळे ही व्यक्ती बेशुद्ध पडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे.

ही घटना चीनमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमधील हार्बन शहरामध्ये हा प्रकार घडला आहे. जिओ फेंगुआ असं या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले त्याप्रमाणे जिओ आपल्या कुत्र्याबरोबर वॉकला जात असतानाच त्यांच्या डोक्यावर एक मांजर पडते. मांजर पडल्यानंतर जिओ बेशुद्ध होतात आणि जागेवरच पडतात. हा प्रकार पाहून आजूबाजूचे पदचारीही चांगलेच घाबरतात. मात्र या पडलेल्या आजोबांच्या मदतीला कोणीही येत नाही.

मालकाच्या डोक्यावर मांजर पडल्यानंतर या व्यक्तीबरोबर असणाऱ्या त्यांचा गोल्डन रिट्रीवर कुत्रा गोंधळतो. काय झालं हे या कुत्र्याला कळतच नाही. काही अंतरावर त्याला मांजर दिसल्यानंतर तो तिच्यावर झडप घालण्यासाठी पुढे जातो तर मांजर त्याला पंजा मारतानाही व्हिडिओत दिसतं. केवळ ४४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये घडणाऱ्या घटना पाहून खरोखरच आश्चर्यचकित व्हायला होतं.

१५ ऑगस्टपासून या व्हिडिओला एक लाख १९ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओखाली कमेंट करुन या व्यक्तीची कोणीतरी मदत करायला हवी होती असं म्हटलं आहे.