रस्त्याच्या बाजूला कचरा गोळा करणारा भिकारी एकवेळचा शार्पशूटर आणि पोलीस उप निरिक्षक असेल, असा विचारही कोणी केला नसेल. पण ग्वाल्हेरमधील डीएसपी रत्नेश तोमर यांना याची प्रचिती आली आहे. १० नोव्हेंबर रोजी डीएसपी रत्नेश तोमर आणि विजय भदोरिया कचरा गोळा करणाऱ्या भिकाऱ्याजवळ थांबले होते. त्यावेळी भिकाऱ्यानं अचानक डीएसपी विजय भदोरिया यांना नावानी हाक मारली. त्यानंतर त्या भिकाऱ्याची चौकशी केली असता बॅचमधील शॉर्पशूटर एसआय मनिष मिश्रा असल्याचं समजलं. त्याची अवस्था पाहून ते दंग झाले. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मनीष मिश्रा या अवस्थेमध्ये पोहचल्याचं विजय भदोरिया यांना समजलं.

१० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशमधील २८ विधानसभा मतदार संघातील मतमोजणी झाल्यानंतर भदोरिया आणि रत्नेश तोमर झाशी रोडवरुन जात होते. त्याचवेळी त्यांचं लक्ष रस्त्याच्या कडेला थंडीत कुडकुडत असलेल्या भिकाऱ्याकडे गेले. त्यांनी गाडी थांबवली अन् विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यानं भदोरिया यांना नावानं हाक मारली. तेव्हा सर्व प्रकार समोर आला.

गेल्या दहा वर्षांपासून मनीष मिश्रा भिकारी बनून फिरत आहेत. जे काही मिळतं तेवढं खाऊन दिवस काढत आहेत. रात्री झोपायला एखादा बसस्टॉप किंवा अडोसा मिळेल त्याठिकाणी विश्रांती घ्यायची असं आयुष्य जगत आहेत. १९९९ मध्ये मनिष मिश्रा मध्य प्रदेश पोलिसांत पोलिस उप निरीक्षक म्हणून भरती झाले होते. त्यांचे सहकारी रत्नेश सिंह तोमर आणि विजय सिंह यांना पदोन्नती मिळून ते डीएसपी झाले तर मनिष यांचं आयुष्य असं काही उलट्या दिशेनं गेलं की ते भिकारी झाले. मनिष मिश्रा यांना उपचारासाठी एका सामाजिक संस्थेत पाठवण्यात आलं आहे.