देशभरात करोना व्हायरसचं संकट वाढत असताना ऑक्सिजनपासून हॉस्पिटलमधील बेडपर्यंत अनेक अत्यावश्यक गोष्टींची उणीव भासत आहे. अशात सोशल मीडियावर काही नेटकरी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचा भडीमार करत आहेत. विविध हॅशटॅग वापरुन मोदी सरकारवर टीका होत आहे. याच संदर्भात फेसबुकवरही पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा हॅशटॅग – #ResignModi ट्रेंड होत होता, मात्र नंतर फेसबुकने हा हॅशटॅगच ब्लॉक केला. यावरुन टीका होण्यास सुरूवात होताच फेसबुकने चूक मान्य केली आणि हा हॅशटॅग पुन्हा रिस्टोर केला आहे.
बुधवारी फेसबुकवर नेटकऱ्यांकडून #ResignModi हा हॅशटॅग ट्रेंड केला जात होता असं समजतंय. पण, नंतर फेसबुकने हा हॅशटॅग ब्लॉक केल्यामुळे गदारोळ झाला. हा हॅशटॅग ब्लॉक झाल्यानंतर काहींनी हॅशटॅग #ResignModi सर्च करण्यास सुरूवात केली असता त्यांना ‘या पोस्ट्स आमच्या कम्युनिटी स्टँडर्ड्सचं उल्लंघन होत असल्याने ब्लॉक करण्यात आल्या आहेत’ अशाप्रकारचा संदेश दिसला. त्यांनतर अनेकांनी हॅशटॅग ब्लॉक केल्यावरुन ट्विटरवर तक्रार करण्यास सुरूवात केली. इतकंच नाही तर काहींनी हा लोकशाहीला धोका असल्याचंही म्हटलं. नंतर काही तासांनी फेसबुकने चूक मान्य करत हॅशटॅग पूर्ववत केला.
This is what happens when you search for the hashtag #ResignModi on Facebook (at least in India). pic.twitter.com/Rzehg3meB8— Shivam Vij (@DilliDurAst) April 28, 2021
Today Facebook has censored all posts with the hashtag #ResignModi! Search for it, and it’s all censored.
Anyone think this would happen in a democracy? pic.twitter.com/eceWK5Sz1k— Shivam Shankar Singh (@ShivamShankarS) April 28, 2021
“आमच्याकडून चुकून तो हॅशटॅग ब्लॉक झाला होता, आम्हाला त्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही सूचना मिळाली नव्हती. आता हॅशटॅग पूर्ववत झाला आहे”, असं स्पष्टीकरण फेसबुकच्या प्रवक्त्याकडून देण्यात आलं आहे. फेसबुककडून वेगवेगळ्या कारणांमुळे हॅशटॅग ब्लॉक केले जातात. काहीवेळेस स्वहस्ते(मॅन्युअली) परंतु बऱ्याचदा स्वयंचलितरित्या(ऑटोमॅटिक) अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित हॅशटॅग ब्लॉक होतात, लेबलशी संबंधित एरर आल्यामुळे तो हॅशटॅग ब्लॉक झाला होता, असं कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, बुधवारी रात्री फेसबुकने हा हॅशटॅग काही तासांसाठी ब्लॉक केला होता. यापूर्वी मंगळवारीही ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नकारात्मक ट्रेंड सुरू होते. जवळपास पाच तास हॅशटॅग ‘फेल्डमोदी’ ट्विटरवर टॉप ट्रेंड होता.