सोशल मिडियावर नेहमी वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र या व्हिडिओंबरोबर असणारी माहिती ही काही वेळेस चुकीची असते. अशाप्रकारे सोशल नेटवर्किंगवरुन अफवा पसरण्याविरोधात शासकीय यंत्रणा, सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, पोलीस असे सर्वचजण कायमच प्रयत्न करत असतात. मात्र अशा अफवांचा प्रमाण कमी होताना दिसत आहे. अनेकदा या अफवांवर स्पष्टीकरण येण्याआधीच त्या सोशल मिडियाच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यत पोहचलेल्या असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये बहरीनच्या राजाबद्दल एक दाखाव करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बहरीनचा राजाची सुरक्षा करण्यासाठी आठ फुटांचा रॉबोट सुरुक्षरक्षक म्हणून तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका कार्यक्रमाच्या ठिकाणी चालत असून त्याच्या मागे मोठ्या आकाराचा रोबोट चालताना दिसत आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रीप्शनमध्ये चालणारा माणूस हा बहरीनचा राजा असून ते दुबईमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचा सुरक्षारक्षक असणारा हा रोबोट त्यांच्या मागे अशापद्धतीने चालत जात होता असा दावा करण्यात आला आहे. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडिओ.

अनेक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्याने त्याला लाखोच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या आधारे काही वृत्तपत्रांनी बातम्याही केल्या आहेत. मात्र आता या व्हिडिओसंदर्भातील एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

सत्य काय?

या व्हायरल व्हिडिओमधील रोबोट खरा असला तरी त्याबरोबऱ शेअर होणारी माहिती पूर्णपणे चुकीची आहे. या व्हिडिओमध्ये रोबोट ज्या व्यक्तीच्या मागे चालत आहे ती व्यक्ती बहरीनचा राजा नाही. तसेच हा रोबोट सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले नाही. या रोबोटचे नाव टायटन आहे. युट्यूबवर हा व्हिडिओ २०१९ साली फेब्रुवारीमध्ये अपलोड करण्यात आला आहे.

२०१९ साली संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) आबु धाबी येथे आयोजित करण्यात आलेल्या डिफेन्स म्हणजेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित इडेक्स एक्झिबिशनमधील आहे.  या व्हिडिओमध्ये टायटन काय करु शकतो याची काही प्रत्यक्षिके दाखवण्यात आली होती. या रोबोटच्या दोन्ही खाद्यांवर आणि हातावर युएईचा झेंडा आहे. या व्हिडिओचा बहरीन किंवा त्यांच्या राजाशी काहीही संबंध नाहीय.