देशातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी, विद्यापिठांनी ऑनलाइन क्लासेस आणि लेक्चर्सची सुरुवात केली आहे. मात्र असं असलं तरी देशातील अनेक भागांमधील विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध नसणे, इंटरनेट कनेक्टीव्हीटी आणि रेंज मिळत नसल्याच्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना या ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेतला अडचणी येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आता सोशल नेटवर्किंगवर एक मेसेज व्हायरल झाला असून या मेसेजमध्ये केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल फोन देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल नेटवर्किंगवर आणि व्हॉट्सअपवर हा मेसेज व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

नक्की वाचा >> “मुलांना शाळेत न पाठवल्याने होणारे परिणाम हे करोना विषाणूपेक्षा अधिक धोकादायक”

काय दावा करण्यात आला आहे मेसेजमध्ये

करोनामुळे सध्या शाळा आणि कॉलेजेस बंद असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आता सर्व विद्यार्थ्यांना मोफत अ‍ॅण्ड्रइड फोन देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या मदतीने ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे अशी सरकारची योजना आहे. मोफत स्मार्टफोन मिळवण्यासाठी पुढील लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि फॉर्म भरा. लोकांच्या सोयीसाठी हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचा. असं केल्यास अधिक अधिक लोकांना या सुविधेचा लाभ घेता येईल असं या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> कोणत्या वयातील लहान मुलांनी मास्क घालावे आणि कोणत्या वयोगटातील मुलांनी नाही?; WHO ने दिली माहिती

सत्य काय?

हा मेसेज सध्या प्रचंड व्हायरल झाला असून याची दखल घेत थेट सरकारच्या पत्रसूचना विभागालाच (पीआयबी) याबद्दल खुलासा करावा लागला आहे. व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. याच ट्विटर हॅण्डलवरुन मोफत अ‍ॅण्ड्रइड फोन देण्याची कोणतीही योजना सरकारने जाहीर केली नसून व्हायरल होणारा मेसेज केवळ अफवा आहे असं म्हटलं आहे.

असा मेसेजमधून व्हायरल केल्या जाणाऱ्या लिंकच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती चोरली जाते असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच खासगी माहिती देण्याआधी युझर्सने काळजी घेणं गरजेचं आहे.