काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी एक एडीट केलेला खोटा फोटो शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाचे कान पिळताना दिसत आहेत तर बाजुच्या फोटोमध्ये जर्मनीचा हुकूमशाह हिटलरही एका मुलीचे कान पिळताना दिसत आहे. मात्र हिटलरचा हा फोटो एटीड करण्यात आल्याचे बुम लाइव्ह या फॅक्टचेक वेबसाईटने म्हटले आहे.

मोदी आणि हिटलरमधील तुलना दाखवण्यासाठी दिव्या स्पंदना यांनी दोघांचे फोटो ट्विट केले आहे. दोघेही लहान मुलांचे कान ओढतानाचा हे फोटो आहेत. हा फोटो ट्विट करताना स्पंदना यांनी तुम्हाला याबद्दल काय वाटते असे विचारले आहे.

मात्र या ट्विटमधला मोदींचा फोटो हा खरा असला तरी हिटलरचा फोटो फोटोशॉप केलेला असल्याचे बुमलाइव्हने केलेल्या तपासात समोर आले आहे. मोदी आणि हिटलरमधील साम्य दाखवण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून हा फोटो व्हायरल केला जात आहे. अनेकांनी स्पंदना यांना हिटलरचा हा फोटो खोटा असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांनी हे ट्विट डिलीट केलेले नाही.

सत्य काय?

या फोटोमध्ये दिसणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे. जपानच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांनी तेथील गोल्डन पव्हेलियन या प्रार्थना स्थळाला भेट दिली त्यावेळी तेथील एका छोट्या मुलाशी मस्करी करतानाचा हा फोटो काढण्यात आला. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने हा फोटो प्रकाशित केला आहे.

फोटो सौजन्य: पीटीआय

रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून हिटलरचा हा फोटो खरा आहे का याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी हिटलरचा हा फोटो खोटा असल्याचे समोर आले. हिटलरच्याच एका जुन्या फोटोमध्ये एटिडींगच्या मदतीने तो मुलीचे कान खेचत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मूळ फोटोमध्ये हिटलरने लहान मुलीच्या खांद्यावर हात ठिवल्याचे दिसते. हा मूळ फोटो एक्सप्रेस डॉट को टॉट युके या वेबसाईटने मार्च २०१७ साली प्रकाशित केला होता. ‘तुम्ही न पहिलेला हिटलर’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या हिटलरच्या अनेक फोटोंपैकी हा एक फोटो होता. या फोटोंच्या माध्यमातून हुकुमशाह असणाऱ्या हिटलरची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न वेबसाईटने केला होता. मात्र अनेकांनी हे फोटो म्हणजे हिटलरची विचारसरणी पसरवण्याचा डाव असल्याचे म्हटले होते. ही मूळ फोटोगॅलरी तुम्ही येथे क्लिक करुन पाहू शकता.

फोटो सौैजन्य: एक्सप्रेस डॉट को डॉट युके

स्पंदना यांनी हा फोटो खोटे असल्याचे समोर आल्यानंतर ट्विट डिलीट केलेले नाही. यासंदर्भात बूमलाइव्हने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘मी फॅक्ट चेकचा लेख रिट्विट करत माझी चूक स्वीकारली आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.

मात्र खोटा फोटो असणारे ट्विट डिलीट का केले नाही याबद्दल स्पंदना यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.