भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असलेले केळे हे फळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, यात काही शंकाच नाही. मात्र पूर्ण पिकलेले, अधिक पिवळे झालेले आणि सालीवर काळे डाग असलेले केळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे वृत्त मध्यंतरी काही संकेतस्थळांवरून प्रसिद्ध झाले होते. अशा प्रकारची केळी खाल्ल्याने ‘टय़ुमर नेक्रॉसिस फॅक्टर’ (टीएनएफ) वाढते. या टीएनएफमुळे असामान्य पेशींचे निराकरण होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, असे केळे कर्करोगविरोधी असून ते खाल्ल्याने पांढऱ्या पेशींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होते, असेही या सांगण्यात आले आहे.

मात्र हे वृत्त असत्य असल्याचा दावा आहारतज्ज्ञ करतात. फळ अधिक पिकल्यानंतर त्याच्या पोषण गुणवत्तेत फरक पडतो. अधिक पिकलेल्या केळ्यामुळे पोषणाची गुणवत्ता वाढेल, मात्र अशा प्रकारची केळी सेवन केल्याचे काही तोटे आहेत. या केळ्यामध्ये शर्करेचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तीतील ग्लुकोजचे प्रमाण तीव्रतेने वाढू शकते, असे आहारतज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे अशा प्रकारची केळी मधुमेहींसाठी बिलकूल उपयुक्त नाहीत. अधिक पिकलेल्या केळ्यामध्ये सूक्ष्म पोषक घटक घटलेले असतात.