अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं. तब्बल सव्वाचार तास चाललेल्या या सामन्यात चाहत्यांनी अविस्मरणीय खेळाचा आनंद घेतला. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात जोकोव्हिचने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. या विजयाची नोंद तर झालीच, पण सामना संपल्यानंतर जोकोव्हिचनं मुलाला दिलेल्या सरप्राईजची चर्चा सोशल मीडियावर होतं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्या मुलाचा आनंद बघण्यासारखाच आहे.

जोकोव्हिचने अंतिम फेरीत त्सित्सिपासवर ६-७ (६/८), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशी बाजी मारत विजय नोंदवला. जोकोव्हिचचे हे फ्रेंच खुल्या स्पर्धेचे दुसरे तर कारकीर्दीतील एकूण १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणाऱ्या राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यापेक्षा तो एका ग्रँडस्लॅम जेतेपदाने मागे आहे. त्याचबरोबर कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पटकावणारा जोकोव्हिच हा खुल्या पर्वामधील पहिला टेनिसपटू ठरला आहे.

हेही वाचा- पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन; त्सित्सिपासनं व्यक्त केला आत्मविश्वास

या ऐतिहासिक विजयानंतर जोकोव्हिचने स्टॅण्डमध्ये सामना बघण्यासाठी आलेल्या एका मुलाच्या दिशेनं हात पुढे केला. यावेळी त्याच्या हातात रॅकेट होतं. जोकोव्हिच शेकहॅण्ड करण्यासाठी हात पुढे करतोय असं त्याला वाटलं. पण, अनपेक्षितपणे जोकोव्हिचने त्याला रॅकेट देऊन टाकलं. जोकोव्हिचनं रॅकेट दिल्यानंतर त्या मुलाला गगन ठेगणं झालं. त्या मुलाच्या आनंदाला पारावारच उरला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- लाल मातीवर सत्ता गाजवत ‘जोकर’ने मोडला ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम!

जोकोव्हिचचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. महान टेनिसपटू ब्योन बोर्ग यांच्या हस्ते जोकोव्हिचला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरवण्यात आले. उपांत्य फेरीत राफेल नदालशी चार तास लढत दिल्यानंतर अंतिम फेरीत जोकोव्हिचला चांगली सुरुवात करता आली नाही.