जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात विजय नोंदवत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. तर ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा ग्रीसचा पहिलाच टेनिसपटू ठरलेल्या स्टेफानोस त्सित्सिपासला पराभव मात्र, पत्करावा लागला. या पराभवानंतरही त्सित्सिपासचा ग्रँडस्लॅम जिंकण्याचा निर्धार दिसून आला. “मला आशा आहे की, मी पुढच्या वर्षी पुन्हा येईन आणि चांगली कामगिरी करेन,” अशा शब्दात त्सित्सिपासने आत्मविश्वास व्यक्त केला.
जागतिक क्रमवारीत अग्रमानांकित असलेल्या जोकोव्हिचने अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं. पहिले दोन सेट गमावल्यानंतरही त्सित्सिपासवर ६-७ (६/८), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशी बाजी मारली. जोकोव्हिचचे हे फ्रेंच खुल्या स्पर्धेचे दुसरे, तर कारकीर्दीतील एकूण १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. तर पहिल्या उपांत्य फेरीत जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह याचा पराभव करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या त्सित्सिपासला पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीचे दोन सेट मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर त्सित्सिपासचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र, जोकोव्हिचने तिसरा सेटमध्ये आक्रमक खेळ करत ६-३ असा सेट जिंकला.
विजेतेपदाला मुकावं लागल्यानंतरही त्सित्सिपानचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलेला दिसला. सामन्यानंतर बोलताना त्सित्सिपान म्हणाला,”माझी कामगिरी चांगली राहिली आणि मी स्वतः खूश आहे. पण, असो हे जेतेपद नोव्हाकला देऊयात कारण, तो किती सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, हे त्याने मागील काही वर्षांमध्ये आपल्याला दाखवून दिलं आहे,” असे गौरवोद्गार त्सित्सिपाने जोकोव्हिचबद्दल काढले.
हेही वाचा- फ्रेंच ओपन : झुंजार त्सित्सिपासला नमवत लढवय्या जोकोव्हिचनं पटकावलं १९वं ग्रँडस्लॅम जेतेपद
“त्याने आतापर्यंत मिळवलेल्या गोष्टींपासून मला प्रेरणा मिळते. मला आशा आहे की, त्याने आतापर्यंत जे काही केलंय, त्याच्या निम्मं तरी मी एक दिवस करून दाखवेन. मला ग्रीसमधून आलेल्या चाहत्यांचे आभार मानतो. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने मदत करणारी आणि सतत मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या टीमचेही मी आभार मानतो. हा कठीण प्रवास आहे आणि दररोज खूप कष्ट करावे लागतात. मला आशा आहे की, पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन आणि चांगली कामगिरी करून दाखवेन,” असा विश्वास त्सित्सिपासने व्यक्त केला.
Looking forward to the years to come #RolandGarros | @steftsitsipas pic.twitter.com/7ueTuYZTu4
— Roland-Garros (@rolandgarros) June 13, 2021
जोकोव्हिच एका ग्रँडस्लॅम जेतेपदाने मागे
जोकोव्हिचचे हे फ्रेंच खुल्या स्पर्धेचे दुसरे तर कारकीर्दीतील एकूण १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणाऱ्या राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यापेक्षा तो एका ग्रँडस्लॅम जेतेपदाने मागे आहे. त्याचबरोबर कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पटकावणारा जोकोव्हिच हा खुल्या पर्वामधील पहिला टेनिसपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेची नऊ, विम्बल्डनची पाच आणि अमेरिकन स्पर्धेची तीन आणि आता फ्रेंच स्पर्धेची दोन जेतेपदे त्याच्या नावावर आहेत.