विवाहितेने शरीरसुखाची मागणी मान्य करावी यासाठी तिच्या नवऱ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना बंगळुरु शहरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विवेश आणि त्याचा २१ वर्षीय भाचा सुमन या दोघांना अटक केली आहे. आरोपी विवेशने हे कृत्य करुन मैत्रीच्या नात्याला तडा दिला. बंगळुरु मिररने हे वृत्त दिले आहे. आरोपी आणि पीडित महिला एकाच कंपनीत नोकरीला होते.

विवेश मार्केटिंग अधिकारी तर संबंधित महिला रिसेप्शनीस्ट होती. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले. मैत्रीचा धागा घट्ट झाल्यानंतर महिलेने तिच्या नवऱ्याबरोबर विवेशची ओळख करुन दिली. सणवार किंवा इतर वेळी विवेश या महिलेच्या घरी जायचा. मैत्रीच्या आडून विवेशची पीडित महिलेवर वाईट नजर होती. तिने त्याच्याकडून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्याच्यावेळी विवेशचा खरा चेहरा समोर आला.

विवेशने पैशांसाठी तगादा सुरु केल्यानंतर महिलेने निम्म्या कर्जाची परतफेड केली. उर्वरित एक लाख रुपये देणे महिलेला शक्य होत नव्हते. त्यावेळी त्याने कर्ज माफीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली. मागच्या तीन महिन्यांपासून विवेश तिला पैशांसाठी सतत त्रास देत होता. तो फोन करुन पतीच्या जीवाला धोका पोहोचवण्याची धमकी द्यायचा. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने त्या कंपनीतली नोकरी सोडली व दुसऱ्या ठिकाणी नोकरीवर रुजू झाली. महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

घटनेच्या दिवशी विवेशने तिच्या घरी येऊन गोंधळ घातला होता. पैशांसाठी तिच्या नवऱ्याला भाग्यवंताला बंधक बनवून ठेवले होते. पैसे दे किंवा नवऱ्याला सोड अशी अट आरोपीने तिच्यासमोर ठेवली होती. तिने त्याची कुठलाही मागणी मान्य करायला नकार दिला. अखेर त्याने भाग्यवंताला गाडीत टाकले व आपल्यासोबत घेऊन गेला. यामध्ये सुमनने त्याला मदत केली. तिने लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आरोपीचा फोन नंबर व कारचा रजिस्ट्रेशन नंबर दिला. त्यानंतर पोलिसांनी भाग्यवंताची सुटका केली. विवेश आणि सुमन आता तुरुंगात असून पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.