हल्ली मोबाइल अॅपद्वारे जेवण मागवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे जसे काही फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटेही आहेत. सध्या सायबर गुन्हेगार अशा प्रकारच्या ऑनलाइन अॅपवर नजर ठेवून आहेत. अशीच एक घटना नुकतीच हरियाणामध्ये घडली. येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर केली. त्यानंतर ती ऑर्डर तिला भलतीच महागात पडली आहे. या ऑर्डरनंतर सायबर गुन्हेगारांनी काही मिनिटातच तिच्या खात्यातून 80 हजार रूपये लुटल्याची घटना घडली आहे.

झोमॅटोच्या अॅपवरून आपण जेवण ऑर्डर केले होते. त्यासाठी आपण पेटीएमद्वारे 190 रूपये दिल्याची माहिती सदर विद्यार्थ्यीनीने दिली. त्यानंतर काही वेळाने तिला जेवणाची ऑर्डर मिळाली. परंतु मिळालेले जेवण चांगले नसल्याने तिने पुन्हा डिलेव्हरी बॉयला ते परत नेण्यास सांगितले. परंतु त्याने त्याला नकार देत गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर घेऊन तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर त्या विद्यार्थीनीने गुगलवर नंबर पाहून त्यावर फोन केला. हा फोन तिला महागात पडेल याचा विचार तिने स्वप्नानतही केला नसेल. दरम्यान, समोरच्या व्यक्तीने तिला बोलण्यात अडकवून तिच्याकडून तिच्या खात्याची माहिती आणि एटीएम कार्डाची संपूर्ण माहिती घेतली. तसेच लवकरच पैसे खात्यात जमा करण्यात येतील असे सांगितले.

त्यानंतर त्वरित आपण रक्कम रिफंड करू असे सांगत समोरील व्यक्तीने त्या विद्यार्थीनीला फोन बंद न करण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या फोनवर अनेक मेसेज आले. तिच्या खात्यातून तब्बल 14 ट्रन्झॅक्शन झाल्याचे मेसेज तिच्या मोबाइलवर आले. आपल्या खात्यातून तब्बल 80 हजार रूपये गायब झाल्याने तिला धक्काच बसला. त्यानंतर विद्यार्थीनीने बँकेत फोन करून आपले कार्ड ब्लॉक केले आणि त्याची पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली. दरम्यान, त्यानंतर त्या विद्यार्थीनीने झोमॅटोच्या ऑफिसलाही भेट दिली. त्यावेळी तिला गुगलवर सापडलेला क्रमांक हा झोमॅटोचा नसल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, त्या विद्यार्थीनीने याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.