परिक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांची सर्वात आधी धावपळ सुरु होते ती नोट्स जमा करण्यासाठी. अकरावीपासून ते अगदी पुढील उच्च शिक्षणापर्यंत अनेकदा मित्राच्या वहीमधील नोट्सच्या झेरॉक्स मारणारे अनेकजण आपल्याला कॉलेजच्या, विद्यापिठांच्या आजूबाजूच्या झेरॉक्स सेंटरवर पहायला मिळतात. मात्र कधीतरी सर्व माहिती असूनही एखाद्याचे अक्षरच समजत नाही. अशावेळी वाटतं या नोट्स डिजीटल फॉरमॅटमध्ये असत्या तर बरं झालं असतं. मात्र आता हे ‘असं वाटणं’ खरोखरच शक्य होणार आहे. गुगल लेन्सने यासंदर्भातील नवीन फिचर लॉन्च केलं आहे. या फिचरमुळे हाताने लिहिलेल्या नोट्समधील माहिती थेट डिजीटल स्वरुपात कॉपी पेस्ट करुन वापरता येणार आहे.

गुगलच्या अधिकृत ब्लॉगवरील माहितीनुसार गुगल लेन्सने ‘कॉपी टू कंप्युटर’ हा नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मात्र हे फिचर तुमच्या मोबाइल फोनच्या कॅमेराच्या माध्यमातून वापरण्यासाठी तुमच्याकडे गुगल लेन्सचे आणि गुगल क्रोमचे अपडेटेड व्हर्जन असणं गरजेचं असल्याचही ब्लॉगमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मोबाइलवर आणि कंप्युटरवर एकाच अकाऊंटवरुन लॉगइन केल्यानंतरच ही सुविधा वापरता येणार आहे.

ज्या नोट्स कॉपी करायच्या आहेत त्यावर मोबाइलच्या कॅमेरा पकडावा. गुगल लेन्सचा पर्याय निवडल्यानंतर ‘कॉपी टू कंप्युटर’ हा पर्याय निवडावा. हवा तो मजकूर सिलेक्ट करुन कॉपी हा पर्याया निवडावा. त्यानंतर कंप्युटरमधील डॉक्युमेंटमध्ये हव्या त्याठिकाणी तो पेस्ट करावा.

तसेच इंग्रजी शब्दांचे योग्य उच्चार कसे करावेत यासंदर्भातील एक फिचरही गुगल लेन्सने नव्या अपडेटमध्ये उपलब्ध करुन दिलं आहे.