गुगल मॅप्सचा वापर सामान्यपणे एखाद्या जागेची किंवा तेथील रस्त्याची माहिती मिळवण्यासाठी केला जातो. पण, सध्या अनेक नेटकरी याचा वापर जगातून निरोप घेतलेल्या आपल्या आजी-आजोबांना किंवा अन्य नातलग आणि मित्रांना शोधण्यासाठी करत आहेत. खरं म्हणजे, गुगल मॅप्समध्ये असलेल्या Street View या फीचरमध्ये अनेक ठिकाणांची वर्षानुवर्षे जुने फोटो दिसतायेत. या फोटोंमध्ये अनेक युजर्सना आपल्या कुटुंबातील मृत सदस्य दिसत आहेत. अनेक वर्षांनंतर नातलग दिसत असल्याने युजर्सही भावूक होतायेत.

सर्वप्रथम, “इतक्या वर्षांनी आजोबांना पाहू शकेल असा कधीही विचार केला नव्हता” असं ट्विट मॅक्सिकोच्या @yajairalyb या युजरने केलं. तिने ट्विटरवर एक व्हिडिओही पोस्ट केला. त्यासोबत, “माझ्या आजोबांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालंय…आम्ही त्यांना गुडबाय देखील बोलू शकलो नव्हतो. काल गुगल मॅप्सवर मी त्यांचे फार्म हाउस चेक करत होते…आणि मी जसजशी पुढे गेले तर मला आजोबा तेथे बसलेले दिसले”. असे ट्विट केले.

हे ट्विट व्हायरल झालं आणि नंतर अनेक युजर्सनी गुगल स्ट्रीट व्ह्यूवर आपआपल्या नातलगांना शोधायला सुरूवात केली.

अनेकांना तर आपले नातेवाईक दिसले देखील. अन्य एका युजरने, “मला माझ्या आजीची खूप आठवण येत होती म्हणून मी त्यांचा पत्ता सहजच गुगल मॅप्सवर सर्च केला. त्यांना पाहून मी माझे अश्रू रोखू शकले नाही. घराच्या फ्रंट यार्डमध्ये आराम करताना मला ती दिसली” असे ट्विट केले.

इतकंच नाही तर स्वतः गुगल मॅप्सनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा टिशू बॉक्स संपला…हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद” असं ट्विट गुगल मॅप्सच्या अधिकृत अकाउंटवरुन करण्यात आलंय.

भारतात नाही काम करत Street View :
जर तुम्ही Street View फीचरचा वापर भारतात करण्याचा विचार करत असाल तर ते शक्य नाही. कारण भारतात हे फीचर काम करत नाही. गुगलने हे फीचर सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली. पण, बांगलादेश, भूटान, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या अन्य आशियाई देशांमध्ये हे फीचर काम करतं.