डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतायेत. दररोज अशाप्रकारच्या बातम्या ऐकायला येत असतात. आता नोएडामध्ये राहणारी नेहा चंद्रा नावाची महिला या फसवणुकीची शिकार झालीये. पीआर कंपनीत काम करणारी नेहा सुट्ट्यांमध्ये पॅरिसला गेली होती. तेथे मेट्रोतून प्रवास करताना तिची पर्स चोरीला गेली. काही पावलं उचलण्याआधीच हॅकर्सनी तिच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे 1.5 लाख रुपये चोरले होते. याहून हैराण करणारी बाब म्हणजे हा सर्व व्यवहार ओटीपीशिवाय पूर्ण करण्यात आला, म्हणजेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचारला जाणारा ओटीपी विचारण्यातच आला नाही आणि हॅकर्सनी सहजपणे नेहाच्या पैशांवर डल्ला मारला.

हॅकर्सनी नेहाच्या खात्यातून तीन वेळेस पैसे ट्रांसफर केले. यात एचडीएफसीच्या डेबिट कार्डद्वारे 52,499.99 रुपये आणि 44,544.24 रुपये, तर HDFC क्रेडिट कार्डद्वारे 52,499.99 रुपये ट्रांसफर करण्यात आले. या घटनेनंतर तातडीने नेहाने एचडीएफसी कस्टमर केअरला फोन लावून कार्ड ब्लॉक केले, आणि खात्यातील शिल्लक रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रांसफर केली. तसेच पॅरिसमध्ये एफआयआर देखील दाखल केला.

ओटीपीची आवश्यकता नाही –
भारतात जारी केलेले डेबिट कार्ड परदेशात ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरल्यास एका ठराविक रक्कमेपर्यंत ओटीपीची आवश्यकता लागत नाही, असे याबाबत बोलताना सिक्युरिटी फर्म Lucideus चे सहसंस्थापक राहुल त्यागी म्हणाले. “अशाप्रकारे फ्रॉड करण्यासाठी हॅकर्सना केवळ कार्ड नंबर आणि CVV ची गरज असते. तर, एटीएम व्यवहारांसाठी हॅकर्सकडे युजरचा पिन अ‍ॅक्सेस करण्याचे अनेक प्रकार आहेत. यात पिन रिसेट करण्यासोबतच स्किमिंग अटॅकचा समावेश आहे”, असेही त्यागी म्हणाले.

परदेशात प्रवासादरम्यान सतर्क राहणं गरजेचं आहे –
– सर्वप्रथम कार्ड सुरक्षित ठेवा आणि चोरीला जाणार नाही याची काळजी घ्या
– देशाबाहेर जाण्याआधी तुमच्या बँकेला माहिती द्या आणि ओटीपीशिवाय होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा किमान करा
– अकाउंटमधून होणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवा आणि काहीही गडबड वाटल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा