हार्ले डेव्हिडसन ही बाईक कंपनी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हार्ले डेव्हिडसनची बाईक, तिचा लुक कुणालाही मोहात पाडेल असाच आहे. मात्र करोनाचा फटका या कंपनीलाही बसला आहे. भारतातून या कंपनीने गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या ७० कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरीही गमवावी लागली आहे. करोना काळात विक्री कमी झाल्याने हार्ले डेव्हिडसन या कंपनीने भारतातली कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील आर्थिक वर्षात हार्ले डेव्हिडसन या कंपनीने भारतात २५०० पेक्षा कमी बाईक विकल्या होत्या. भारतातला या कंपनीची ही सुमार कामगिरी ठरली. एवढंच नाही तर कंपनीने ७० कर्मचाऱ्यांनाही नारळ दिला आहे. फेब्रुवारी २०१८ या आर्थिक वर्षात हार्ले डेव्हिडसन या कंपनीने ३४०० पेक्षा जास्त बाईक विकल्या होत्या. मागील तीन ते चार वर्षांपासून या कंपनीचा चांगला व्यवसाय होता. मात्र मागील आर्थिक वर्षापासून या कंपनीला अडचणी येत होत्या.

हार्ले डेव्हिडसन ही कंपनी इंडियन, बेनेली, कावासाकी, डुकाटी यासारख्या कंपन्यांना टक्कर देतच होती. तसंच यामाहा, सुझुकी आणि होंडा यांच्या प्रिमियम रेंजच्या बाईक्ससोबतही स्पर्धा करत होती. आता ही कंपनी भारतातून गाशा गुंडाळते आहे. करोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे विक्रीवर झालेला प्रचंड परिणाम हे यामागचं सर्वात मोठं कारण आहे.