ऐंशी-नव्वदीच्या दशकात आपल्या कॉमेडीचं टायमिंग आणि स्टायलिश डान्सने तरुणांना वेड लावणाऱ्या गोविंदाचे आजही अनेक चाहते आहेत. सोशल मीडियातून त्याच्या चाहत्यांनी केलेले डान्स समोर आले आहेत. गोविंदाचा डायहार्ट फॅन असलेल्या ‘डान्सिंग अंकल’ना सोशल मीडियामुळे तुफान प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर आता गोविंदाचा हा चिमुकला चाहता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या मुलाच्या डान्सवर नेटकरी फिदा झाले असून त्याचा व्हिडिओ तीन दिवसांत तब्बल १५ लाख युजर्सनी पाहिला आहे.

गोविंदा आपल्या जबरदस्त कॉमेडीचं टायमिंग, कलरफुल कपडे आणि डान्सिंग स्कीलमुळे तरुणांमध्ये लोकप्रिय होता. हिंदी चित्रपटांमधील डान्समधून त्याचं हे एनर्जेटिक व्यक्तीमत्व उठून दिसायचं. त्यासाठी त्यावेळचे टीनएज आणि प्रौढ चाहतेही वेडे होते. गोविंदाची स्टाईल आणि त्याच्या गाण्यांवर थिरकण्याची आवड अजूनही अनेकांनी जपली आहे. सन २०१८ च्या उन्हाळ्यात युजर्स संजीव श्रीवास्तव यांचा सोशल मीडियावर गोविंदाचा डान्स पाहून हरखून गेले होते. त्यामुळे ते ‘डान्सिंग अंकल’ नावाने प्रसिद्ध झाले होते. मध्य प्रदेशचे रहिवासी असलेले ४६ वर्षीय श्रीवास्तव एका रात्रीतून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. डान्सप्रेमी तरुणांनाही ते गोविंदाप्रमाणे ते आयडॉल वाटू लागले होते.

त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत असून या व्हिडिओने हे स्पष्ट केले आहे की, ‘डान्सिंग अंकल’ ही काही एकमेव व्यक्ती नाही जी गोविंदाचा तंतोतंत डान्स करु शकते. या व्हिडिओमध्ये ग्रामीण भागातील एका वस्तीवरील अंगणात एक लहान मुलगा गोविंदाच्या ‘किती डिस्को मे जाये….’या प्रसिद्ध गाण्यावर गोविंदा इतक्याच ताकदीने डान्स करताना दिसतो आहे. गीतकार आणि लेखक मनोज मुंतशीर यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओने तीन दिवसांतच तब्बल १५ लाख युजर्सनी पाहिला आहे. त्याचबरोबर यावर दीड लाख लाईक्स आले असून ३०,००० युजर्सनी तो रिट्विटही केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना बॉलिवडूमधील घराणेशाहीवर टीका करीत मुंतशीर यांनी लिहिलं आहे की, “अशा प्रकारचं वेडं टॅलेंट हे फक्त मातीच्या घरांमध्ये सापडू शकतं. घराणेशाहीच्या शोरुम्समध्ये ते सापडणार नाही. या मुलाच्या धैर्याला अनेकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाल जिथपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत पोहोचवा. तुम्ही या मुलाचा पत्ता शोधून काढा, मी तुम्हाला आश्वासन देतो की याला ज्या श्रीमंतांच्या मुलांना मिळतात त्या सर्व सुविधांसह चांगल्यातलं चांगलं ट्रेनिंग देईल, अशा मुलांच्या भविष्याची जबाबदारी माझी आहे आणि त्यांना शोधून काढणं आपली. तेव्हा लागा कामाला.”

दरम्यान, या पोस्टवर एका युजरने कमेंट करुन म्हटलं की, “यांना कोण प्रशिक्षित करतं. यांच्या शिक्षकांचीही दखल घेतली गेली पाहिजे.” “आता आपल्या दिग्दर्शकांची जबाबदारी आहे की, त्यांनी अशा टँलेंटला जगासमोर आणलं पाहिजे,” असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे.