वर्गांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या शिकविण्याकडे लक्ष आहे की नाही, याचा वेध घेणारे एक अनोखे उपकरण अमेरिकेतील कंपनीकडून विकसीत करण्यात आले आहे. डोक्याला बसविण्यात येणाºया हेडबँण्डद्वारे विद्यार्थ्यांच्या मेंदूमधील सक्रियेतचा आढावा घेणे सहज शक्य आहे. चीनमधील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांवर या उपकरणाची चाचणी घेण्यात आली आहे. मात्र, काही न्यूरोशास्त्रज्ञांनी या उपकरणावर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या गोपनियतेसंबंधी चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील ‘ब्रेनको’ या स्टार्टअप कंपनीने ‘फोकस १ हेडबँण्ड विकसीत केले आहे. या उपकरणामुळे शिक्षकांना विशेष मदत होईल. कोणत्या विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे हे या उपकरणाद्वारे स्पष्ट होईल. नुकतेच चीनमध्ये १०-१७ वयोगटातील विद्यार्थ्यांवर यासंबंधीच चाचणी देखील करण्यात आली आहे. इतकेच नाही तर अमेरिका, मेक्सिको, स्पेन आणि ब्राझीलमधील शाळांमध्ये देखील या उपकरणांचा वापर केला जात आहे. वर्गातील विद्यार्थ्यांच्या डोक्याला हेडबँण्ड लावल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या समोरील संगणकावर विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या सक्रियेतीची माहिती दिसेल.
कोणत्या विद्यार्थ्याचे वर्गामध्ये किती लक्ष आहे हे संबंधित माहितीवरून स्पष्ट होईल. त्यामुळे शिक्षकांना आपल्या शिकविण्याच्या पद्घतीमध्ये बदल करण्याबरोबर संबंधित विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या मेंदूचा वेध घेण्यासाठी उपकरणामध्ये इलेक्ट्रोएन्सेफोग्राफीचा वापर करण्यात आला आहे. चीनमधील २१ दिवसांच्या चाचणीमध्ये जवळपास १० हजार विद्यार्थ्यांवर याचा प्रयोग करण्यात आला. मात्र, काही न्यूरोवैज्ञानिकांनी या उपकरणाच्या प्रभावीपणा व तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.