काही दिवसांपूर्वी ‘लॉरिअल’ ही जगप्रसिद्ध आणि नामांकित सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं हिजाब परिधान करणाऱ्या मॉडेलला आपल्या जाहिरातीत स्थान दिलं होतं. लॉरिअलच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होती, कारण लॉरिअलनं पहिल्यांदाच हिबाज घालणाऱ्या मॉडेलला आपल्या जाहिरातीत स्थान दिलं होतं. हॉलिवूडच काय पण बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्री या ब्रँडच्या ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ आहेत. यात ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, दीपिका पादुकोन, कतरिना कैफ अशा अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यामुळे या नामांकित कंपनीच्या जाहिरातीत काम करणं म्हणजे अनेक मॉडेल्ससाठी स्वप्नच असतं. काही दिवसांपुर्वी या कंपनीनं अमेना खान या ब्रिटीश मॉडेलची ब्रिटनमधल्या शॅम्पूच्या जाहिरातीसाठी निवड केली होती.

पण, ही घोषणा करून काही दिवस होत नाही तोच या अमेनानं या कॅम्पेनमधून माघार घेतली आहे. त्याचं कारण होतं तिने इस्त्रायलविरोधात केलेलं ट्विट. २०१४ मध्ये तिनं हे ट्विट केलं होतं. हे ट्विट कधीच डिलीट करण्यात आलं. अमेनानं इस्त्रायलविरोधात केलेल्या ट्विटची माफीही मागितली. पण, वाद क्षमला नाही. अखेर तिनं या कॅम्पेनमधून माघार घेतली. तिनं इन्स्टाग्रामवर आपला माफीनामा पोस्ट केला आहे.

काही दिवसांपूर्वी अमेनानं या कॅम्पेनचा व्हिडिओ शेअर केला होता. विशेष म्हणजे शॅम्पूच्या जाहिरातीत सर्व मॉडेल्सने आपले मुलायम केस दाखवले पण, अमेनानं मात्र शेवटपर्यंत हिजाबच परिधान केला होता त्यामुळे ही जाहिरात सर्वांपेक्षा वेगळी ठरली होती.