महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी रंजक वळण आलं. अजित पवार यांनी आधी उपमुख्यमंत्रिपदाचा व त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. “अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही”, असं म्हणत फडणवीसांनी राजीनामा देत असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यानंतर सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल होऊ लागले.

शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंगळवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने भाजपाकडे बहुमत राहिले नाही. त्यामुळे अजित पवारांपाठोपाठ फडणवीसांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.  उद्या, (बुधवारी) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.