भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये केवळ तरूणच नाही तर आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. अशाच एक केस पार पांढरे झालेल्या आजीबाईंनी सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या आजीबाई केवळ सामन्याचा आनंदच घेत नव्हत्या तर भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारखी चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. त्यांचा उत्साह बघून समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुली व हर्षा भोगले यांनादेखील या आजीबाईंची दखल घ्यावीशी वाटली. संपूर्ण वर्ल्ड कपमधला सगळ्यात सुंदर क्षण जोकॅमेऱ्यानं टिपलाय अशा शब्दांमध्ये गांगुलीनं या आजीबाईंचं कौतुक केलं. केवळ समालोचकच नाही तर नेटकरीही या आजीबाईंच्या ‘क्युटनेस’वर फिदा झाले आहेत. दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणाऱ्या या आजींची झकल टिव्हीवर दाखवल्यानंतर काही क्षणांमध्ये ट्विटवर त्यांचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या आजींसंदर्भात महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विट केले आहे.

आनंद महिंद्रा हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अनेकदा ते ट्विटवरुन क्रिकेटसंदर्भातील ट्विट करत असतात. मात्र अनेकदा त्यांनी भारतीय संघाचे सामना बघत नाही असं सांगितलं आहे. मात्र आज एका खास कारणासाठी मी सामना पाहणार असल्याचे ट्विट केले आहे. ‘मी सामान्यपणे भारताचे सामने पाहत नाही मात्र या आजींचा चेहरा पाण्यासाठी मी टिव्ही सुरु करणार आहे. त्या एखाद्या मॅच विनरच वाटतात,’ असे आनंद महिद्रांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान भारताला पाठिंबा दर्शवण्यासाठी इंग्लंडच्या कानाकोपऱ्यातून भारतीय चाहते मैदानामध्ये हजर असतात. आत्तापर्यंत भारताला इंग्लंडमध्ये होम ग्राऊण्ड असल्यासारखाच पाठिंबा मिळाला आहे. मात्र या सर्व चाहत्यांमध्ये या आजी जरा खासच असल्याचं नेटकऱ्यांच म्हणणं आहे.