जगभरातील वेगवगेळ्या देशांमधील आरोग्य कर्मचारी, नर्सेस आणि डॉक्टर करोनाच्या संकटाला धीराने तोंड देत आहे. यासाठी सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. दिवसोंदिवस करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाही सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांना बरं करण्यासाठी रात्रंदिवस झटताना दिसत आहेत. त्यातच करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक तास या कर्मचाऱ्यांना पीपीईमध्ये (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट) राहूनच रुग्णांवर उपचार करावे लागतात. या पीपीईमुळे रुग्णांवर उपचार करताना एक तांत्रिकपणा येतो. त्यामुळेच  कॅलिफोर्नियाच्या सेन डियागो येथील एका श्वसन आजारासंबंधातील डॉक्टरने करोनाबाधितांवर पचार करताना वापरल्या जाणाऱ्या पीपीईवर स्वत:चा हसरा फोटो लावला होता. यामुळे करोनाबाधितांना इलाज घेताना भिती वाटणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. आता याच पार्श्वभूमीवर भारतामधील अरुणाचलमधील काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चा फोटो पीपीईवर लावून रुग्णसेवा करण्यास सुरुवात केली आहे.

अरुणाचलमधील चँगलांग जिल्ह्यातील करोनाबाधितांवर उपचार करण्यात येणाऱ्या केंद्रावरील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या पीपीई ड्रेसवर स्वत:चे हसरे फोटो चिटकवले आहेत. जिल्हा आयुक्त देवांश यादव यांनी ट्विटवरुन या कर्मचाऱ्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक करत ते जगापर्यंत पोहचावं या उद्देशाने काही फोटो शेअर केले आहेत.

“चँगलांग येथील कोवीड केअर सेंटरमधील हे आपले करोनायोद्धे. या योद्ध्यांनी आपल्या पीपीईवर स्वत:चे फोटो लावून रुग्णसेवेला मानवी किनार देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे कोवीड समोपदेशन होईल. मास्कच्या मागे कोण आहे हे समजल्यानंतर रुग्णांचीही चिंता कमी होईल,” असं ट्विट यादव यांनी केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी तीन फोटोही ट्विट केले आहेत.

चँगलांग येथील इतर कोवीड सेंटरमध्येही अशाप्रकारचा प्रयोग करण्याची संकल्पना यादव यांनी मांडली आहे. “काही आठवड्यांपूर्वी तेथील परिस्थिती भयंकर होती. येथील अनेक रुग्णांनी माणसांचे चेहरेच बघितलेले नाहीयत. काही जणांचा यामध्येच मृत्यू झाला आहे. त्यामुळेच ही वेगळी कल्पना नक्कीच रुग्णांना दिलासा देणारी ठरु शकते,” असं मत यादव यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना व्यक्त केलं आहे.