भारतातील जवळपास सर्वच पदार्थ आता परदेशात उपलब्ध होतात. जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीयांची संख्या जास्त असल्याने हे पदार्थ उपलब्ध असतात. मात्र यातली विशेष बाब म्हणजे आता चीनच्या बाजारातही भारतीय वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याचे आपल्याला पहायला मिळते. चीनमध्ये निर्मिती होणाऱ्या मालानंतर ग्राहकांची भारतीय वस्तूंना पसंती असल्याचे दिसते.

चीनमध्ये असलेल्या ‘द सिंगल्स डे’ च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सेलमध्ये भारतीय किराणा आणि पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. ऑनलाईन खरेदीमध्येही चीन आणि अमेरीकेत तयार झालेल्या मालाबरोबरच भारतीय मालालाही मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती असल्याचे दिसले. यामध्ये भारतीय किराणा माल, रेडीमेड पदार्थ, ऑयुर्वेदिक उत्पादने यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. यातही अमूल, हिमालया, एमडीएच मसाला, गिटस, हल्दीराम, टाटा टी, डाबर आणि पतंजलीसारख्या ब्रँडसना पसंती असल्याचे या खरेदीवरुन दिसून आले आहे.

या सेलदरम्यान मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्याने खरेदी करणाऱ्यांनी अक्षरशः उड्या टाकल्या आहेत. भारतीय गोष्टी खरेदी करणाऱ्यांमध्ये पाकिस्तान, जपान,अरब आणि युरोपिय देशांतील नागरीकांची संख्या जास्त असल्याचे दिसले. त्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारात विशेष स्थान असल्याचे यामध्ये दिसून आले आहे.