तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिस आपल्या कर्मचाऱ्यांची दुप्पट पगारवाढ करत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचा ‘ब्रिज प्रोग्राम’ पूर्ण केलाय अशा कर्मचाऱ्यांची पगारवाढ कंपनीकडून केली जात आहे. अशाप्रकारचे प्रोग्राम कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या कामापेक्षा अधिक कौशल्यपूर्ण काम मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. टीसीएस आणि विप्रोसारख्या अनेक भारतीय आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कंसल्टिंग, ऑटोमेशन, आर्टिफिशल इंटेलिजंस आणि मशीन लर्निंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळावं यासाठी पुढाकार घेत आहेत. अशात इंफोसिसने अर्ध्या डझनपेक्षा जास्त ब्रिज प्रोग्रॅम विकसित केले आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे अशांसाठी इन्फोसिसने एक प्रोग्राम सुरू केला आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ म्हणजे अशी वेळ असते ज्यावेळी कर्मचारी पदोन्नती किंवा जास्त पगाराची नोकरी पाहायला सुरूवात करतो, किंवा पुढील शिक्षण घेण्यासाठी नोकरी सोडतो. अशा कर्मचाऱ्यांसाठी इन्फोसिसने कंसल्टिंग प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक टेस्ट आणि तीन महिन्यांचा पुस्तकी अभ्यासक्रम ठरवण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांना एक कंसल्टिंग प्रोजेक्टवर 6 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. एकदा कर्मचाऱ्याने हा प्रोग्राम पूर्ण केल्यानंतर त्याला जास्त सॅलरीचं पॅकेज आणि पदोन्नती किंवा वेगळं काम करायला मिळतं. हा प्रोग्राम पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची 80 ते 120 टक्के पगारवाढ झाली आहे, आतापर्यंत जवळपास 400 कर्मचाऱ्यांनी हा प्रोग्राम पूर्ण केला आहे.

‘आम्ही आमच्या प्रतिभावान कर्मचाऱ्यांना एमबीए किंवा इतर शिक्षणासाठी सोडू इच्छित नाही, याउलट ब्रिज प्रोग्राम्सद्वारे आम्ही त्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी उपलब्ध करुन देत आहोत’, असं इन्फोसिसचे प्रमुख एचआर कृष शंकर म्हणाले.