इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात केली आहे. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला राजस्थानचा संघ १४८ धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून आश्वासक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना ठराविक अंतराने धक्के देणं सुरु ठेवलं. राजस्थानकडून बेन स्टोक्सने एकाकी झुंज दिली, परंतू दिल्लीच्या गोलंदाजांसमोर त्याचीही डाळ शिजू शकली नाही. राहुल तेवतियाने अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून रंगत निर्माण केली. परंतू तुषार देशपांडेने भेदक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. या सामन्यातील काही क्षण सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातीलच एक क्षण म्हणजे  जोफ्रा आर्चरने केलेला भारतीय डान्स.

दिल्लीच्या डावाची सुरुवातच खराब झाली. जोफ्रा आर्चरचा टप्पा पडून आत येणारा चेंडू पृथ्वी शॉला समजायच्या आतच बेल्स उडाल्या होत्या. पहिल्याच चेंडूवर महत्वाचा फलंदाज माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या संघाने एकच जल्लोष केला. पृथ्वीला बाद केल्यानंतर जोफ्रा आर्चरने बिहू नृत्याच्या स्टेप्स करत आनंद साजरा केला. याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

काय आहे राजस्थान संघाचे बिहू कनेक्शन

रविवारी राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. राहुल तेवतिया (नाबाद ४५ धावा) आणि रियान परागने (२६ चेंडूत नाबाद ४२ धावा) यांनी नाबाद ८५ धावांची भागीदारी करत राजस्थानच्या या विजयात मोलाची भर घातली होती. रियाननेच विजयी षटकार लगावात संघाचा विजय निश्चित केला. या षटकारानंतर परागने आपल्या संघ सहकाऱ्यांकडे पाहून बिहू नृत्याच्या स्टेप्स केल्या होत्या. पराग हा मूळचा आसामचा असल्याने त्याने आसामची ओळख म्हणून लोकप्रिय असणाऱ्या बिहूच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला.

रविवारच्या सामन्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना परागने, “मला अशा परिस्थितीमध्ये चांगला खेळ करताना आनंद होतो. जेव्हा संघाला माझी गरज असते तेव्हा मला चांगला खेळ करता येतो याचा आनंद आहे. तो बिहू डान्स होता. तो आसामचे पारंपारिक नृत्य आहे. आमच्या संघात काही आसाममधील खेळाडू आहेत. त्यामुळे विजयानंतर आम्ही असाच काही आनंद साजरा केला,” असं सांगितलं होतं. आता परागच्या या बिहूची जादू राजस्थानमधील परदेशी संघ सहकाऱ्यांपर्यंत पोहचल्याचेच या व्हायरल व्हीडिओतून दिसत आहे.