इतिहास, भूगोल, विज्ञान यांसारख्या विविध विषयांची सखोल माहिती देणाऱ्या डिस्कव्हरी या वाहिनीने माहिती व मनोरंजन यांचे योग्य मिश्रण करून ‘इन्फोटेन्मेट’ ही नवीन संकल्पना निर्माण केली. १९८५ साली सुरु झालेल्या डिस्कव्हरीने गेल्या ३४ वर्षांत कठीणातले कठीण विषय अगदी मनोरंजक पद्धतीने हाताळणाऱ्या नोव्हा, वंडर्स ऑफ द युनिव्हर्स, स्मॅश लॅब, एक्सट्रीम इंजीनियरिंग यांसारख्या शेकडो मालिका तयार केल्या आहेत. अशीच माहितीचा प्रचंड साठा असलेली एक नवी मालिका ‘सावेज बिल्ड्स’ डिस्कव्हरी वाहिनीवर सुरु करण्यात आली आहे.
अॅडम सावेज हे या मालिकेचे सूत्रसंचालन करत आहेत. तसेच त्यांनी मालिकेच्या पहिल्याच भागात सुपरहिरो आयर्नमॅनचा ‘आयर्न आर्मर मार्क – २’ तयार करून दाखवल्यामुळे ही मालिका जबरदस्त चर्चेत आहे. अॅडम सावेज हे स्पेशल इफेक्ट डिझायनर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर गॅलेक्सी क्वीस्ट, स्टार वॉर्स, द मेट्रिक्स, स्पेस काऊबॉय, आयर्नमॅन यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी विविध प्रकारची यांत्रिक उपकरणे तयार केली आहेत. सावेज बिल्ड्स या मालिकेच्या माध्यमातून चित्रपटांसाठी तयार केलेली यांत्रिक उपकरणे ते प्रत्यक्ष आयुष्यात कशी असतील हे करून दाखवणार आहेत.
चित्रपटांमध्ये झळकणारा सुपरहिरो आयर्नमॅन हा आपल्या आयर्न आर्मर व अत्याधुनिक उपकरणांसाठी ओळखला जातो. परंतु खऱ्या आयुष्यात ही सर्व उपकरणे अॅडम सावेज यांच्या कल्पनेतून साकार झाली आहेत. ही उपकरणे तयार करताना त्यांना आलेले विविध अनुभव ते या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 19, 2019 4:11 pm