उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चा १ मे रोजी थांबल्या जेव्हा ते सार्वजनिकरित्या एका कार्यक्रमासाठी जगासमोर आले. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं याबाबत माहिती देताना  किम जोंग उन हे २० दिवसांनी सर्वांसमोर आल्याचं स्पष्ट केलं. १५ एप्रिलपासून त्यांच्या तब्बेतीसंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुटल चर्चा सुरु होत्या. मात्र आता किम जोंग उन समोर आल्यानंतर पुन्हा एकदा नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. या चर्चांनुसार जगासमोर आलेले किम जोंग उन नसून त्यांच्यासारखीच दिसणार दुसरी व्यक्ती म्हणजेच बॉडी डबल आहे. यासंदर्भातील जुने आणि नवीन फोटोंमधील फरक दाखवणारे एक वृत्त ‘डेली मेल’ने दिलं आहे.

सुनचिओन येथे उभारण्यात आलेल्या एका खताच्या कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी किम जोंग उन हे १ मे रोजी उपस्थित होते. यासंदर्भातील माहिती कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनेच (केसीएनए) जरी केली होती. सुनचिओन हे उत्तर कोरियाची राजधानी प्योगयांगपासून जवळच आहे. या कार्यक्रमाला किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग देखील उपस्थित होत्या. दरम्यान, ते कंपनीचं उद्घाटन करत असतानाचे काही फोटोही समोर आले आहेत. उत्तर कोरियासंदर्भातील जाणार असणारे पत्रकार आणि संशोधक मार्टीन विलियम्स यांनी किम जोंग उन यांचे फोटो ट्विट केले होते.

मात्र आता याच फोटोंवरुन फोटोत दिसणारी व्यक्ती किम जोंग उन नसल्याची चर्चा नेटवर रंगली आहे. हा किम यांचा बॉडी डबल असेल तर अगदीच उत्तम आहे असं ट्विट एका व्यक्तीने केलं आहे.

अशाप्रकारे एका प्रसिद्ध नेत्याचे बॉडी डबल असण्याबद्दलची चर्चा पहिल्यांदाच झालेली नाही. या आधी हिटलर, स्टॅलिन, सद्दाम हुसैन यांच्यासारख्या नेत्यांचेही अनेक बॉडी डबल असल्याच्या चर्चा वेळोवेळी झाल्याचे दाखले इतिहासात सापडतात. जगासमोर आलेली व्यक्ती ही बॉडी डबल असल्याचे सांगता लोकांनी प्रामुख्याने किम जोंग उन यांचे जुने आणि आता समोर आलेल्या फोटोंमधील फरक याबद्दल चर्चा केली आहे. खास करुन आताच्या फोटोत किम जोंग उन यांचे दात आणि कान अगदीच वेगळे दिसत असल्याचा दावा नेटवर अनेकांनी केला आहे.

ब्रिटनमधील माजी खासदार असणाऱ्या लुइस मॅनसेच यांनाही ट्विटवरुन किम यांचा आताचा फोटो हा आधीच्या फोटोपेक्षा वेगळा असल्याचे ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी किम यांचे दात, ओठ आणि जबड्याचा आकार वेगळा दिसत असल्याचे लुइस यांनी म्हटलं आहे.

मात्र ज्या फोटोंवरुन ही चर्चा सुरु आहे हे फोटो फेरफार करण्यात आलेले असल्याचे वृत्त काही वेबसाईट्सने दिले आहे. एका व्यक्तीने यासंदर्भात या माजी ब्रिटीश महिला खासदाराला सांगितले असता, “मी यावरुन वाद घालणार नाहीय. पण दिलेल्या माहितीसोबत याचं की नाही हे आपण ठरवावं पण या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत,” असं मत त्यांनी मांडलं आहे.

डेली मेल या वृत्त पत्रानेही किम जोंग उन यांच्या कनाच्या पाळ्यांमध्येही खूप बदल झाल्याचे म्हटलं आहे.

फोटो सौजन्य: डेली मेल

मात्र अनेकांनी या फोटोंमध्ये वापरण्यात आलेला जुना फोटो हा दशकभरापुर्वीचा असल्याचे सांगत, जेवण, वय आणि रहाणीमान यानुसार व्यक्तीच्या दिसण्यामध्ये फरक पडू शकतो असे मत व्यक्त केलं आहे. जेनिफर झेंग नावाच्या एका महिला ब्लॉगरनेही किम यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरुनही चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोंमध्ये आधीच्या आणि नंतरच्या फोटोंमध्ये किम यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ एक लाल रंगाची खूण दिसत आहे. काहींनी ही खूण किम यांच्यावर झालेल्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रीयेशीसंबंधित असेल असं मत नोंदवलं आहे.

 फोटो सौजन्य: डेली मेल

नेटकऱ्यांमध्ये किम यांच्या बॉडी डबलवरुन मतमतांतरे असली तरी किम यांनी २० दिवसांनंतर जगासमोर आल्याने पुन्हा एकदा नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे हे मात्र खरं.