काही वर्षांपूर्वी दिल्ली-६ या चित्रपटातील ‘मसक्कली मसक्कली’ हे गाण सर्वांच्याच पसंतीस उतरलं होतं. आता या गाण्याचं रिमेक करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून टॉप ट्रेडिंगमध्ये हे गाणं आहे. सिद्धार्थ मलहोत्रा, तारा सुतारिया यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. तर तनिष्क बागची यानं या गाण्याचं रिमेक केलं आहे. परंतु आता झालंय असं की जयपूर पोलिसांनी हे गाणं एक लोकांना चेतावणी म्हणून ट्विट केलं आहे. जर लॉकडाउनमध्ये कोणीही इथेतिथे फिरताना दिसलं तर त्यांना एका खोलीत बंद करून पुढील काही दिवस सतत मसक्कली २.० हे गाणं ऐकवण्यात येणार आहे. जयपूर पोलिसांनी यावर आळा घालण्यासाठी अनोखा फंडा तयार केला आहे.

गुरूवारी जयपूर पोलिसांनी एक फोटो ट्विट केला आहे. मत उडियो, तू डरियो, ना कर मनमानी, मनमानी, घर में ही रहियो, ना कर नादानी, ऐ मसक्कली, मसक्कली असं गाण्यातील शब्दांचं आपल्या शब्दात गुंफत एक कॅप्शनही दिलं आहे. तर या ट्विटला त्यांनी या गाण्याशी संबंधीत सर्वांना टॅगही केलं आहे. तर कोणी लॉकडाउनच्या काळात फिरताना सापडलं तर त्यांना एका खोलीत बंद करून लूपमध्ये केवळ हेच गाणं ऐकवलं जाईल, असं त्यात लिहिलं आहे.

जयपूर पोलिसांच्या या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय दिले आहे. त्यात काहींनी या गाण्यासोबत बाहेर फिरणाऱ्यांना ढिंच्याक पूजाची गाणीही ऐकवण्यास सांगितलं आहे. तर काही जणांनी पोलिसांच्या या नव्या कल्पनेचं स्वागत केलं आहे.