प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. जपानमधल्या एका तरुणानं याच प्रेमापोटी व्हर्च्युअल रिअॅलिटी सिंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉलोग्रामशी लग्न केलंय.  लग्नासाठी त्यानं लाखो रुपये खर्च केले, पण या लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.

पहिल्यांदाच अशा प्रकारचा लग्नसोहळा जपानमध्ये पार पडत आहे. अकिहीको कोंडो या ३१ वर्षांच्या तरुणानं हटसुने मिकू या हॉलोग्रामशी लग्न केलं आहे. हटसुने मिकू हे निळ्या रंगाचं व्हर्च्युअल रिअॅलिटी कॅरेक्टर जपानमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. ही निलपरी लहानग्यांच्या तर खूपच आवडती आहे. अकिहीकोदेखील तिच्या प्रेमात पूर्वीपासूनच आकंठ बुडाला आहे. म्हणूनच त्यानं तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

टोकियोमध्ये  मिकूच्या बाहुलीरुपाशी अकिहीकोनं लग्न केलं. या बाहुलीला त्यानं अंगठीही दिली. तर त्यानं घरात एक डेक्सटॉप डिवाइस खरेदी केलं आहे. याद्वारे त्याला व्हर्च्युअल मिकूला पाहता येणार आहे. मिकूसोबत मी सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य व्यतीत करत आहे. ती मला रोज उठवते, माझ्या झोपण्याच्या जेवण्याच्या वेळेचीही आठवण करून देते. मी तिचा कधीही विश्वासघात करणार नाही असं अकिहीकोनं सांगितलं.
अकिहीको आणि मिकूचं लग्न जरी समाजास मान्य नसलं तरी मिकूची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं अकिहीकोला लग्नाचा दाखला दिला आहे.