‘फिफा वर्ल्ड कप’ सामन्यादरम्यान एका कृतीमुळे जपानी लोकांनी सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं. जपानी संघानं सामना जिंकल्यानंतर मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी स्टेडिअम साफ केलं होतं. स्टेडिअमध्ये आम्ही कचरा केला नाही. मग ते आम्ही साफ का करावं? असा विचार त्याच्या मनाला शिवलादेखील नाही. त्याच्या या कृतीचं जगभरातील लोकांनी कौतुक केलं.

बेल्जिअम विरुद्ध जपान सामन्यात जपानचा पराभव झाला. पण स्टेडियममधून बाहेर जाण्याआधी जपानी संघानं ड्रेसिंग रूम पूर्णपणे स्वच्छ केली आणि आवरून ठेवली. स्पर्धेच्या काळात प्रत्येक संघाला आपले सामान ठेवण्यासाठी लॉकर आणि ड्रेसिंग रूम देण्यात आली होती. ती पूर्ण खोली जपानच्या संघातील खेळाडूंनी आवरून ठेवली. याशिवाय, रशियाचे धन्यवाद मानणारी एक छोटीशी चिट्ठीदेखील ठेवली. या दोन कृतीमुळे जपानी लोकांविषयी अनेकांच्या मनात मोठा आदर निर्माण झाला. जपानी लोक शिस्तप्रिय तर आहेच पण स्वच्छतेसाठी आग्रहीदेखील आहेत. स्वच्छतेचं महत्त्व अगदी लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. किंबहुना शाळेत ‘स्वच्छता’ हा वेगळा विषयच जपानी मुलांना अभ्यासासाठी असतो.

शाळेत शिकताना लहान मुलं स्वत:चा वर्ग स्वत: साफ करतात. अनेक पाश्चिमात्य देशांना मुलांना वर्ग साफ करायला लावणं म्हणजे त्यांची पिळवणूक वाटते. मात्र जपान या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. प्रत्येक मुलं शाळेत असतानाच स्वच्छतेबाबत अधिक दक्ष होत जातो. जर तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तर काम करायला हुरूप येतं. तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळते, म्हणून आपली जागा स्वच्छ ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे जपानी शाळेत शिकवलं जातं. म्हणूनच शाळेची फरशी साफ करण्यापासून टॉयलेटदेखील ही मुलं स्वत: साफ करतात. ‘गाक्को सोजी’ म्हणून हा तास ओळखला जातो. या तासाला मुलं आवडीनं स्वच्छतेच्या कामात सहभागी होतात.

यावेळी शिक्षकही मुलांसोबत सहभागी होतात. प्रत्येक मुलं मन लावून काम करतं. त्यामुळे लहान वयातच एक जबाबदार नागरिक होण्याची तयारी सुरू होते. ही चांगली सवय प्रत्येक जपानी नागरिकात इतकी घट्ट रुजते की जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी हे लोक आपली मुल्ये जपतात.