महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुत्रसंचलनामुळे अल्पावधित प्रसिद्धी मिळालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे संपूर्ण देशभरात कोट्यवधी चाहते निर्माण झाले आहेत. या गेम शो मध्ये पहिल्यांदा एक करोड रुपयांचं बक्षीस मिळवण्याचा मान हर्षवर्धन नवाने या मराठी तरुणाने पटकावला होता. आयपीएस अधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या हर्षवर्धन नवाथेचं या शोमध्ये बक्षीस मिळवल्यानंतर जगच बदलून गेलं. २००१ साली हर्षवर्धन पहिला करोडपती झाला. IAS अधिकारी बनण्याची इच्छा असलेल्या हर्षवर्धनला या शो मुळे मिळालेल्या प्रसिद्धीमुळे परीक्षा देता आली नाही.

एक कोटीसारखी मोठी रक्कम जिंकल्यानंतर कोणाचंही आयुष्य सहज बदलू शकतं. पण IAS ची परीक्षा देण्याचं स्वप्न पूर्ण न झाल्यानंतरही हर्षवर्धनने निराश न होता पैशांचा योग्य वापर करण्याचं ठरवलं. स्कॉटलंड येखील एडिनबर्ग नेपियर युनिव्हर्सिटीत हर्षवर्धनने MBA साठी अ‍ॅडमिशन घेतलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन यांनी १ करोड रुपयांचं बक्षीस जिंकल्यानंतरचा घटनाक्रम सांगितला. “वाहिनीसोबत झालेल्या करारामुळे मला IAS ची परीक्षा देता आली नाही. मात्र मी हार न मानता, काही NGO च्या माध्यमातून सरकारी प्रोजेक्टसाठी काम करायला सुरुवात केली.

हर्षवर्धन सध्या महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये कामाला आहेत

२००५ मध्ये आपलं शिक्षण पूर्ण करुन हर्षवर्धन मुंबईत परत आला. यानंतर त्याने IL&FS या फायनान्स कंपनीत कामाला सुरुवात केली. यानंतर आपल्या कामात प्रगती करत हर्षवर्धन २००७ साली Naandi Foundation चा State Director म्हणून काम करायला लागला. यानंतर एका परदेशी कंपनीत हर्षवर्धनने CEO म्हणून काम केलं. हर्षवर्धन यांनी मराठी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात काम करणाऱ्या सारिका निलाटकर हिच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलं आहेत. सध्या हर्षवर्धन महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कामाला आहेत.