मदतीचा हात प्रत्येकाला हवा असतो, तो आपण दिला तर त्यात मोठेपणा काहीच नाही…असे साधे विचार आहेत, कोल्हापूरमधील एका हॉटेल मालकाचे . सैनिकभरतीसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरूणांना मोफत जेवण देण्याचा विडा कोल्हापूरातील हॉटेल खगंमच्या मालकाने उचलला आहे. सुधांशु नाईक असे त्या हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांचा हा अनोखा पाहुणचार पाहून उमेदवार भारावून गेले आहेत.

राजस्थान, युपी- बिहार पासून गोंदिया, यवतमाळ यासारख्या ठिकाणाहून कोल्हापूरला हजारो तरूण रातोरात दाखल झाले आहेत. सैन्य भरतीसाठी येणारे बहुतांश उमेदवार ग्रामीण भागातील व सामान्य कुटुंबातील आहे. सैन्य भरतीसाठी लक्षणीय गर्दी असल्याने येथील खानावळ, हॉटेल मोठी गर्दी आहे. परिस्थितीचा फायदा घेत कोल्हापूरातील काही हॉटेलमालकांनी जेवणाची किंमत दुपटीने वाढवली. सात रूपयांना मिळणारी चपाती २० ते २५ रूपयांना तर ६० ते ७० रूपयांत मिळणारी थाळी २०० रूपयांना केली होती. मात्र, सामाजिकतेचे भान असणाऱ्या सुधांशु नाईक यांना तरूणांची परिस्थिती पाहवली नाही. सुधांशु यांनी पैशांचा विचार न करता सर्वांना नाश्ता आणि जेवण दिले. काही जणांनी जेवण केल्यानंतर प्रमाणिकपणे पैसे दिले..तर काही जणांच्या खिशात पैसे नव्हते, त्यांनी धन्यवाद म्हटले.

सुधांशु सांगतात… आज भरतीसाठी आलेले तरूण उद्या भारताच्या रक्षणासाठी सिमेवर उभे ठाकणार आहेत…मी ज्यांना जेवण दिले त्यामधील एक जरी भरती झाला तरी माझे पैसे फिटले. सैन्यभरतीसाठी आलेल्या तरूणांची परिस्थिती बिकट आहे. इथं मिळेल तो प्रत्येकजण त्यांना लुबाडतोय. कालपासून रात्रभर फुटपाथवर झोपलेल्या तरूणांनी.. सकाळपासून मिळेल त्या जवळच्या हॉटेलात तुडुंब गर्दी केली. कोल्हापूरातील परीख पुलाजवळच्या शाखेत रेल्वेस्टेशनवरुन आलेल्या – परत जाणा-या अनेकजणांची एकच गर्दी होती. हॉटेलमध्ये प्रवेश करताच प्रत्येकजण दरवाज्यातून रेट विचारू लागला…आम्ही म्हटलं, ” या आता. खा पोटभर. असतील तर पैसे द्या नाहीतर फुकट जेवून जा..”

पटकन् काही जण म्हणाले, ” काका, अहो, काही हाॅटेल्सनी आमची गर्दी बघून रेट दुप्पट केलेत, १७०, २०० रु थाळी जेवलोय काल रात्री.. म्हणून विचारतोय हो..” मग परत एकदा सांगितलं. ” पैशाची काळजी करुच नका. आमची साधी थाळी 70 रु याच रेटला मिळेल..तेही असतील तर द्या…नाहीतर फुकट खा..काहीच प्राॅब्लेम नाही, पण उपाशीपोटी राहू नका.”

सुधांशु यांनी सकाळपासून ४०० जणांना जेवण तर किमान ३०० जणांना नाश्ता दिला आहे. त्यांचे दोन वेळा हॉटेलातील रेशन संपले..पण त्यांनी गल्ल्यात किती पैसे पडले याचा विचार न कराता मनाला किती समाधान मिळतेय याचा विचार केला. त्यांची ही पंगत उद्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे. या कामासाठी त्यांना त्यांच्या पत्नी स्वरदा नाईक यांची अनन्यसाधारण मदत झाली आहे.