करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे करोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाला आळा बसत असला तरी गरिब आणि हातावर पोट असणाऱ्यांना भुकेनं ग्रासल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. असाच बिहारमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये लहान मुलं भूख भागवण्यासाठी चक्क बेडकं खात आहेत.

हा व्हिडिओ बिहारमधील जहानाबाद येथील आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत मुलगा सांगतोय की, ‘देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे घरातील अन्नधान्य संपलं आहे. घरात खाण्याशाठी काहीही नसल्यामुळे बेडकं खाऊन भूक मिटवतोय. आधी आम्ही आजूबाजूची बेडकं पकडतो. त्यानंतर त्याचं काताडे काढून आगीवर भाजून खातो.’

बिहारमधील या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही टीका झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं त्या भागात कम्युनीटी किचनची सुरूवात केली आहे.


दरम्यान, भारतामध्ये करोना व्हायरसचं संक्रमण वाढलं आहे. दिवसागणिक मृत्यूची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त जणांचा या महामारीनं बळी घेतला आहे. तर १६ हजारापेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे.