लक्समबर्ग हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याठिकाणी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. आता अशाप्रकारे सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यामागे नेमके काय कारण असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर या लहानग्या देशात अतिशय मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ही समस्या कमी व्हावी यासाठी सरकारने मोफत सार्वजनिक वाहतुकीचा उपाय शोधून काढला आहे. एका अहवालानुसार, २०१६ मध्ये वाहनचालक साधारणपणे ३३ तास ट्रॅफीकमध्ये अडकलेले असायचे. या देशात एकूण ६ लाख रहिवासी आहेत. तर फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियममधील जवळपास २ लाख लोक रोज रोज कामासाठी लक्समबर्गमध्ये येतात. सरकारने मोफत प्रवास जाहीर केल्यानंतर जास्तीत जास्त प्रवासी स्वत:च्या गाडीने प्रवास न करता सार्वजनिक वाहनांचा वापर करतील अशी आशा आहे. ज्यामुळे ट्रॅफीकची समस्या काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होईल.

२० वर्षाच्या आतील मुलांना देशातील प्रवास पूर्णपणे मोफत आहे. तर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांची शाळा आणि घर यासाठी मोफत शटल आहे. तर इतर प्रवाशांना २ तासांच्या प्रवासासाठी १६२ रुपये मोजावे लागणार आहेत. हा निर्णय अद्याप पूर्णपणे लागू झालेला नसून त्याबाबत विचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. ट्रेनमधील फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या डब्यांचे काय करायचे याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. देशात येणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे असे म्हटले जात आहे. मात्र काहीही असले तरी अशाप्रकारे पूर्णपणे मोफत प्रवास मिळत असेल तर तेथील नागरिकांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे.