स्मार्टफोन, इंटरनेट या गोष्टी आता आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. काही लोकं याचा प्रमाणाच्या बाहेर वापर करतात तर काही प्रमाणात करताना आपल्याला दिसतात. महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. तसंच अनेकदा ते सोशल मीडियावर अनेकांना रिप्लायही देताना दिसतात. त्यांनी नुकताच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्मार्टफोनविषयी कदाचित तुमच्या मनात असलेला राग कमी होईल.

आनंद्र महिंद्रा यांनी शुक्रवारी दुपारी एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ त्यांनी टाकल्यानंतर त्या व्हिडीओला काही मिनिटांमध्येच त्याला हजारो लाईक्स मिळाले. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका मिठाईच्या दुकानाबाहेर बसला आहे. तसंच त्याच्या हातात एक मोबाईल दिसत आहे. या फोटोतील ती व्यक्ती साईन लँग्वेजमध्ये समोरच्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे.

ती व्यक्ती साईन लँग्वेजमध्ये एका व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर बोलत आहे. हे केवळ स्मार्टफोनमुळे शक्य झालं आहे. मोबाईल उपकरणांनी जगावर ज्याप्रकारे कब्जा केला आहे. त्यावर आपण बरेचदा टीका करतो. हे लक्षात ठेवणे चांगले आहे की या उपकरणांनी आपल्यातील बर्‍याच जणांसाठी संवादाचं नवं जग निर्माण केलं आहे, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.