सध्या पासवर्ड रीसेट करणं काही मोठी गोष्ट नाहीये. अनेकदा असं होतं की, आपण आपल्या एखाद्या अकाउंटचा पासवर्ड विसरतो, त्यामुळे लॉगइन करताना समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा आपण पासवर्ड रीसेट करण्यासाठी नवीन पासवर्ड बनवतो किंवा पासवर्ड रीसेट करण्यासाठी गुगल-युट्यूबवर सांगितलेल्या पद्धतीचा वापर करतो. मात्र एका जीमेल वापरकर्त्याने पासवर्ड विसरल्यावर चक्क थेट गुगलच्या सीईओंकडेच मदत मागितल्याचं समोर आलं आहे.

मधन (@Madhan67966174) नावाच्या एका ट्विटर युजरने सुंदर पिचाई यांच्याकडे जीमेलचा पासवर्ड रीसेट करण्यासाठी मदत करा अशी मागणी केली. “हॅलो सर, तुम्ही कसे आहात? सर, मी जीमेलचा पासवर्ड विसरलो असून तो रिकव्हर करण्यासाठी कृपया मला मदत करा”, असं म्हणत त्याने पिचाई यांना टॅग केलं होतं. थेट गुगलच्या सीईओंना केलेली अशी मागणी बघून अन्य नेटकरी मात्र चांगलेच हैराण झाले.


सुंदर पिचाई यांनी २६ एप्रिल रोजी ट्विटरद्वारे, त्यांची कंपनी करोना संकटाच्या दुसऱ्या लाटीचा सामना करणाऱ्या भारतासाठी UNICEF आणि Give India यांना135 कोटी रुपयांची मदत करत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या ट्विटवर @Madhan67966174 या भारतीय युजरने थेट त्यांना पासवर्ड रीसेट करण्याची विनंती केली. अर्थात त्याच्या या ट्विटवर पिचाई यांच्याकडून काहीही रिप्लाय आला नाही, अन्य नेटकऱ्यांनी मात्र चांगलीच मजा घेतली.


सध्या सुंदर पिचाई अमेरिकेत आहेत. ज्यावेळी प्रवासावरील निर्बंध हटवले जातील. त्यावेळी ते तुमच्या घरीत येतील व पासवर्ड रिकव्हर करण्यास मदत करतील अशाप्रकारचे अनेक मजेशीर रिप्लाय नेटकरी करत आहेत.