अमेरिकेतला एक माणूस मराठी शिकायला डोंबिवलीत आला.

पण काही केल्या त्याला मराठी शिकणं जमेना.

सहा महिन्यांनी तो अमेरिकेत परत गेला तेव्हा त्याला दोनच वाक्य येत होती.

“अरे वा. लाईट आले!”

“आई गं, परत गेले!”

या वरच्या जोकमध्ये ‘डोंबिवली’च्या जागी बाकी कुठलंही शहर, गाव टाकत हा मेसेज फिरून फिरून जाम जुना झालाय. मुख्य शहरांपासून जरा दूर गेलं की हीच परिस्थिती सगळीकडे दिसते. शहरी आणि निमशहरी भागात ज्यांना शक्य आहे त्यांनी लगेचच इन्व्हर्टर लावून घेतले. पण गावाकडे वीज गेली तर अजूनही प्रचंड हाल होतात.

भारतात अजूनही फक्त ७६ टक्के लोकांकडे वीज आहे.  यामध्येही जास्तीत जास्त लोकांकडे दिवसांचे काही तासच वीज उपलब्ध असते. २४ तास वीज असणाऱ्यांचा टक्का तर फारच खालचा आहे. त्यात देशाच्या ज्या भागात कडक उन्हाळा असतो त्या भागातल्या नागरिकांचे जास्तच हाल होतात.

चेन्नईजवळ असलेल्या एका हातमाग गिरणीत काम करणाऱ्या एका वृध्द माणसाच्या माणसाच्या नातवाने आपल्या आजोबांसाठी एक विजेविना चालणारा पंखा तयार केला.

व्हिडिओ- हिटलरपासून ६६९ ज्यू मुलांना वाचवणारा देवदूत

चेन्नईजवळ राहणारा डिझाईन इंजिनियर दिनेश याने हा विजेशिवाय चालणारा पंखा तयार केला आहे. आता विजेशिवाय हा पंखा चालणार कसा? यावरचा तोडगा म्हणून आपल्या आजोबांच्या हातमागालाच दिनेशने हा पंखा जोडला. दिनेशचे आजोबा जसजसं त्यांच्या हातमागावर काम करतात तसा त्याच ऊर्जेने हा पंखाही चालतो आणि थोडीथोडकी का होईना दिनेशच्या आजोबांना काम करताना थंड हवा मिळते.

या सगळ्याचा एक व्हिडिओसुध्दा दिनेशने तयार केला आहे. तो सध्या इंटरनेट वर व्हायरल झालाय .

आपलं इंजिनिअरिंगचं ज्ञान फक्त पुस्तकात न ठेवता त्याचा प्रॅक्टिकल वापर करणाऱ्या दिनेशच्या कौशल्याला आणि काहीतरी नवं करण्याच्या इच्छेला सलाम!