फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपली पत्नी डॉ. प्रिसिला चान हिला शांत झोप लागावी किंवा तिची वारंवार झोपमोड होऊ नये यासाठी एक खास उपकरण तयार केलं आहे. झुकरबर्गने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर या उपकरणाचं एक छायाचित्र शेअर केलं आहे.

मार्क झुकरबर्गने एक लाकडी बॉक्स बनवला असून हा बॉक्स सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान आपोआप चमकायला लागतो. झुकरबर्गची पत्नी प्रिसिला यांना रोज सकाळी आपल्या मुलांची तयारी करुन त्यांना शाळेत पाठवण्यासाठी उठावं लागतं. त्यामुळे रात्री झोपेतून अनेकदा ती उठून वेळ किती झाली आहे ते पाहते, त्यामुळे वारंवार तिची झोपमोड होते. पण आता या ग्लोइंग वुडन बॉक्समुळे प्रिसिलाची झोपमोड होत नाही, किंवा रात्रीतून तिला वारंवार उठायला लागत नाही.
https://www.instagram.com/p/BwxCPidhe0V/

पत्नीमुळे आली डोक्यात कल्पना –
अशाप्रकारचा बॉक्स बनवण्याची कल्पना पत्नीमुळे आली. रोज सकाळी मुलांची तयारी करण्यासाठी ती सकाळी उठून वेळ किती झाली ते बघते, वेळ कळल्यानंतर चिंतेमुळे आणि झोपमोड झाल्यामुळे तिला पुन्हा झोप लागत नाही. त्यामुळे अशाप्रकारचं एखादं उपकरण बनवण्याची कल्पना डोक्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान हा बॉक्स चमकायला लागतो, याच्या प्रकाशामुळे आता दोघांपैकी कुणीतरी उठून मुलांची तयारी करण्याची वेळ झाल्याचं आम्हाला कळतं असं झुकरबर्ग यांनी सांगितलं. पण एखाद्याला त्रास व्हावा इतक्या प्रमाणातही हा बॉक्स चमकत नाही असंही झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं. रात्रीतून झोपमोड झाल्यास आता ती घड्याळात वेळ किती झाली ते बघत नाही, त्यामुळे वेळेची चिंता नसल्यामुळे कोणताही विचार न करता ती पुन्हा थेट झोपी जाते. हे उपकरण बनवताना मला जेवढी अपेक्षा नव्हती त्याहून चांगला याचा निकाल असल्याचंही झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं.