भारतामधील समाज व्यवस्था ही पितृसत्ताक पद्धतीची आहे. म्हणजेच पुरुष हा कुटुंबप्रमुख असतो आणि त्याच्या संपत्तीमधील जवळजवळ सर्वच हिस्सा मुलाला मिळतो. मागील अनेक दशकांपासून भारतामध्ये अशाच पद्धतीची समाज रचना पहायला मिळत आहे. मुलींना त्यांच्या हक्कांसाठी झगडावं लागत असल्याचे चित्र काही नवीन नाही. मागील एक ते दीड दशकापासून महिलांनाही वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क मिळण्यासंदर्भाती काही महत्वाची पावले उचलली गेल्याचे पहावयास मिळते. मात्र असं असलं तरी आजही आपल्याकडे बहुतांश ठिकाणी वडिलांचा उद्योग व्यवसाय मुलाच्याच हाती जातो असं दिसतं. त्यामुळेच अनेक आपल्याला कुटुंबाच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या कंपनीच्या किंवा दुकानांच्या नावांमध्ये अडनावांपुढे अ‍ॅण्ड सन्स लावल्याचे पहायला मिळतं.  आपल्यापैकी अनेकांनी अशी नावं पाहिली असतील. मात्र सोशल मिडियावर सध्या या पारंपारिक विचारसरणीचा विरोध करणारा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेला फोटो हा पंजाबमधील लुधियाना शहरातील आहे. या शहरातील एका मेडिकलचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. सामान्यपणे पारंपारिक पद्धतीने अडनावापुढे अ‍ॅण्ड सन्स  लावून नाव देण्याऐवजी या दुकानाच्या मालकाने आपल्या मेडिकलच्या नवाचा, “गुप्ता अ‍ॅण्ड डॉटर्स” असा बॅनर लावला आहे. पंजाबमधील डॉक्टर अमन कश्यप यांनी ट्विटवरुन या दुकानाच्या बॅनरचा फोटो शेअर केला आहे. “सगळीकडे अ‍ॅण्ड सन्सच्या नावाने दुकाने सुरु होत असतानाच लुधियानामध्ये गुप्ता अ‍ॅण्ड डॉटर्स नाव मेडिकलला देण्यात आलं आहे. जो बदल तुम्हाला जगात घडावा असं वाटत असेल त्या बदलाची सुरुवात तुम्ही स्वत:पासून करा,” अशी कॅप्शन या फोटोला अमन यांनी दिली आहे.

अमन यांनी पोस्ट केलेल्या या फोटोवरुन भविष्यात हे मेडिकल मालकाच्या मुलींच्या हाती जाणार असल्याचे दिसून येत आहे. या फोटोवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या असून अनेकांनी हा बदल कौतुकास्पद असल्याचे म्हटलं आहे.

हे पण बघा

अशा गोष्टी रिट्विट केल्या पाहिजेत

उत्तम निर्णय

हाच नवा मार्ग

हे पाहून आनंद झाला

शब्बास गुप्ताजी

बदल बघून आनंद झाला

ट्रेण्ड सेटर

अमन यांनी पोस्ट केलेला हा फोटो एक हजार ३०० हून अधिक जणांनी शेअर केला आहे. काहींना या फोटोवर प्रतिक्रिया देताना आमिर खानने याच मुद्दावर आधारित तयार केलेल्या जाहिरातीची लिंकही पोस्ट केली आहे.