.कचरा वेचणाऱ्यांचे शिक्षण ते काय हो? शिक्षणाचे तर सोडाच त्यांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही तिथे शिक्षण घेण्यासाठी पैसे तरी कुठून येणार म्हणा? आणि शिक्षण घेतले तरी ते कचरा थोडीच वेचणार? आपल्या भविष्याचा ते नक्की विचार करतील आणि चांगली नोकरी करतील. पण एक कचरा वेचक यापेक्षा वेगळा आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बीन बॅग थिअरी या युट्युब अकाऊंटवरून व्हायरल झालेला हा व्हिडिओ आहे. काही मुलांनी एका कचरा वेचकाची छोटीशी मुलाखत घेतली होती. एखादा कचरा वेचक काय सांगेल असे तुम्हाला वाटत असेल, पण कचरा वेचक छोट्याशा व्हिडिओमध्येही असे काही सांगून गेला की ते प्रत्येकालाच विचार करायला लावेल.

दिल्लीमधल्या कचरा वेचकाचा हा व्हिडिओ आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा किंवा कचऱ्यांच्या पेटीत उदरनिर्वाहासाठी काहीना ना काही शोधणाऱ्या त्या कचरा वेचकांबद्दल आपल्यापैकी अनेकांना फारसे काही वाटत नाही. पण हा कचरेवाला त्याहूनही वेगळा आहे. बीकॉमपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले आहे शिवाय १४ वर्षे नोकरीही केली आहे. हिंदीबरोबर इंग्रजी भाषेचेही त्याला उत्तम ज्ञान आहे. पण तरीही रस्त्यावरचा कचरा वेचण्याचे काम करतो आणि त्यावरच आपल्या कुटुंबाचे पोट भरतो. कचरा वेचण्यात काय गैर आहे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतोय, देशही स्वच्छ होतोय, माझ्या कुटुंबाचे पोटही भरतंय मग सुशिक्षित माणसाने कचरा वेचण्याचे काम केले तर काय बिघडलं, असा प्रश्न तो समाजला विचारतो? देश बदलायला पाहिजे असं नेहमीच जो तो बोलतो पण या सगळ्या फक्त फुशारक्या आहेत प्रत्यक्षात मात्र काम करण्याची वेळ आली की कोणीही पुढाकार घेत नाही, अशी खंत त्याने बोलून दाखवली म्हणूनच प्रत्येकाने थोडा का होईना पण पुढकार घेऊन देशाची सेवा करावी, अशी विनंती त्याने केली आहे. खरंतर हा व्हिडिओ जुना आहे, पण सोशल मीडियावर पुन्हा एकदा नव्याने व्हायरल होत आहे.