देवेश गोंडाणे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या जनतेने जो बायडन यांची निवड केली आहे. अत्यंत रंगतदार झालेल्या लढतीत जो बायडन यांनी अत्यंत रोमहर्षक विजय मिळवला. त्यांनी त्यानंतर केलेलं भाषणही गाजलं. बायडेन यांनी ट्रम्प यांना मतं दिलेल्या मतदारांनाही झालं गेलं विसरुन आपण एकमेकांना संधी देऊ असं म्हटलं आहे. अशातच जो बायडन यांचं मुंबईपाठोपाठ नागपूरसोबत असलेलं जिव्हाळ्याचं नातंही समोर आलं आहे. २०१३ आणि २०१५ मध्ये बायडेन यांनी याबाबत उल्लेख केला होता.

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे नातेवाईक चक्क उपराजधानीत आहेत. ईस्ट इंडिया कंपनी सोबत भारतात आले असतानापासून त्यांचे नातेवाईक नागपुरात वास्तव्यास आहेत. जो बायडन यांचे हे नातेवाईक गेल्या १२० वर्षांपासून येथे वास्तव्य करत आहेत.  जो बायडन यांचे पूर्वज असलेले लेस्ली बायडन यांचे नातू सोनिया बायडन फ्रान्सिस हे नागपुरात असून जो बायडन यांच्यासोबत त्यांचा काही वेळा पत्रव्यवहारही केला होता हे विशेष.

 

जो बायडन यांचे पूर्वज लेस्ली बायडन त्यांच्या पत्नीसह

 

जो बायडन यांचे पूर्वज १८७३ साली ब्रिटन येथून ईस्ट इंडिया कंपनी सोबत भारतात आले. तेव्हापासून ते नागपुरात राहतात. त्यापैकी लेस्ली बायडन यांनी जो बायडन यांना १८८१ साली पहिल्यांदा पत्र पाठविले होते. दोघांदरम्यान झालेल्या पत्रव्यवहारात त्यांनी त्यांच्या नातेवाइकांबाबत चर्चा केली होती. लेस्ली बायडन त्यांचे नातू नागपुरात राहतात. ते १८७३ पासून येथे वास्तव्यास असल्याचे सांगतात. त्यापैकी सोनिया बायडन फ्रान्सिस यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीवरील बातमीला दुजोरा दिला. सोनिया या प्रसिद्ध मनोसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लेस्ली बायडन हे भारत लॉज येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांचा मृत्यू १९८३ रोजी झाला.

सोनिया बायडन यांचा भाऊ इयान बायडन हे सुद्धा नागपुरातच वास्तव्यास असून त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये काम केलेले आहे. यावेळी त्यांनी जो आणि लेस्ली यांच्यादरम्यान झालेल्या पात्रव्यव्हाराच्या प्रती देखील दाखविल्या. नागपुरात स्थायिक झालेल्या बायडन कुटुंबातील काही सदस्य मुंबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही वास्तव्यास आहेत.

जो बायडन यांनी नातेवाईंचा केला होता उल्लेख
२०१८ साली लेस्ली यांचे नातू डेविड यांच्या लग्नसमारंभासाठी हे सर्व बायडन कुटुंब एकत्र जमले होते. २०१५ साली जो बायडन यांनी वॉशिंग्टन येथे आपल्या भाषणादरम्यान आपले पूर्वज भरतात राहतात असा उल्लेख केला होता. मात्र, जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हे कुटुंब प्रकाशझोतात आले. जो बायडन यांना त्यांचा यशाबद्दल सर्व नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.