पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसाच्या बंगलादेश दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील त्यांच्या भाषणांबरोबरच त्यांनी हिंदू मंदिराला दिलेली भेट आणि पश्चिम बंगाल, आसाममधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यावरुन आरोप प्रत्यारोपांमुळे दौरा चांगलाच गाजला. याशिवाय या दौऱ्यामधील मोदींच्या भाषणातील संदर्भ आणि त्यांनी  ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारक येथील नोंदवहीमधील लिहिलेल्या संदेशाचा फोटोही चांगलेच व्हायरल झाले. या नोंदवहीमध्ये मोदींनी लिहिलेल्या संदेशाबरोबरच त्यांच्या हस्ताक्षराचं कौतुक होत असल्याचं चित्र इंटरनेटवर दिसून आलं. मात्र आता मोदींचं हे हस्ताक्षर खरं आहे की खोटं असा प्रश्न काँग्रेसच्या एका नेत्याने उपस्थित केलाय. यासंदर्भातील एक व्हिडीओच या नेत्याने पोस्ट केलाय.

झालं असं की, महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशमधील शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकामधील नोंदवहीत केलेल्या नोदींचा फोटो पोस्ट केला. “काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी बांगलादेश दौऱ्यावर बांगलादेश मुक्ती संग्रामातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी एक श्रध्दांजली संदेश शहीदांना अर्पण केला आहे. त्या संदेशासोबत त्यांचे अतिशय सुरेख आणि सुंदर अक्षरसुद्धा पाहण्यासारखे आहे,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली होती.

मात्र या फोटोवर काँग्रेसमधील अनुसुचित जाती विभागातील प्रदेश कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. जितेंद्र देहाडे यांनी ट्विट करुन रिप्लाय केलाय. या ट्विटमध्ये देहाडे यांनी साबरमती आश्रमातील भेटीचा जुना व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये साबरमती येथील नोंदवहीमध्ये आधीच लिहून ठेवलेल्या संदेशावर मोदी स्वाक्षरी करताना दिसत आहेत. “माननिय पंतप्रधान हे नेहमीच आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी करतात. यावर कधी कोणीही आक्षेप घेतला नाही मग हा सुंदर हस्ताक्षराचा खटाटोप कशासाठी. मा.पंतप्रधान यांनी साबरमती आश्रम मधील भेटीत अभ्यागत पुस्तकामधे आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी केली होती,” असं दहाडे यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांनी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टॅग करत, “चंद्रकांत पाटील दादा, आपल्या पक्षाच्या सोशल मिडिया टीमची कीव येते. एवढा खोटेपणा कशासाठी…” असा प्रश्न विचारला आहे.

दहाडेच नाही तर भाजपाच्या या ट्विटखाली अनेकांनी मोदींनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान वेगवेगळं हस्ताक्षर पहायला मिळाल्याचे फोटो ट्विट केले. पाहुयात यापैकीच काही ट्विट…

१)

२)

३)

४)

५)

इतकच काय तर एकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच २०१४ साली अशाच एका व्हायरल फोटोवर दिलेला रिप्लाय शोधून तो भाजपाच्या ट्विटवर पोस्ट केलाय. या रिप्लायमध्ये मोदींनी, “विचार आणि स्वाक्षरी माझी असली तरी हा संदेश इतर कोणीतरी लिहला आहे,” असं म्हटलं आहे.

बांगलादेशमधील नोंदवहीचा हा फोटो मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता या पोस्टच्या निमित्ताने तो पुन्हा चर्चेत आलाय.