विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी क्रिकेटला अलविदा करणार असे साऱ्यांना वाटले होते. पण धोनीने आपल्याला सैन्यदलाची सेवा करायची असल्यामुळे दोन महिने विश्रांती घेत आहोत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवले. त्यानंतर धोनीवर सर्वच प्रकारात कौतुकांचा वर्षाव होत आहे.

लष्कारासोबत ट्रेनिंग घेत असताना धोनी जवानांसोबतच राहत आहे. इतर जवानाप्रमाणे धोनीची खोलीही अगदीच लहान आहे. जम्मू काश्मीरमध्ये धोनी लष्करात दाखल झाल्यानंतर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोत धोनी लष्कराच्या वेशात असून बूट पॉलिश करत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

१०० कोटींहून अधिक पैसे कमवणारा धोनी जेव्हा बूट पॉलिश करतो आणि जवानांसोबत राहतो तेव्हा खरी माणुसकी कळते”, असे ट्वीट एका नेटकऱ्याने केले आहे. याआधी धोनीचा जवानांसोबत बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

धोनी सध्या भारतीय लष्कराच्या कॅम्पमध्ये आहे. भारतीय सैन्यात सेवा देता यावी आणि भारतीयांची सेवा करता यावी, यासाठी धोनीने टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली. धोनी ज्या बटालियनमध्ये आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातील विविध विभागातून आलेले जवान आहेत. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. या वेळी धोनीकडे ५ किलो वजनाच्या ३ मॅगझीन, ३ किलोग्रॅम वजनाचा पोशाख, २ किलो वजनाचे बूट, ४ किलोचे ३ ते ६ ग्रेनेड, १ किलोचे हेल्मेट आणि ४ किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण १९ किलो वजन असणार आहे.

“धोनी आता १०६ टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा सदस्य (पॅरा) आहे. त्यामुळे तो आता अनेकांचे रक्षण करू शकतो. ही बटालियन अत्यंत दमदार कामगिरी करणारी बटालियन आहे आणि तो हाच बटालियनचा भाग आहे, त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची गरज लागणार नाही”, असा विश्वास लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीबाबत बोलताना व्यक्त केला आहे.