मुंबई पोलीस मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव म्हणजे अगदी वर्षाचे 12 महिने 24 तास ऑन ड्युटी असतात. तरीही पोलीस म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात. पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत अनेकदा सामान्य नागरिकांकडून आक्षेप व्यक्त केला जातो. पण हेच मुंबई पोलीस सध्या चर्चेत आहेत ते एका सकारात्मक कारणासाठी. हे कारण म्हणजे मुंबईत एकट्या राहणाऱ्या एका आजींचा वाढदिवस मुंबई पोलिसांनी नुकताच मोठ्या थाटात साजरा केलाय. या सेलिब्रेशनचे फोटोही मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केलेत.

मुंबईच्या खार परिसरात राहणाऱ्या 77 वर्षांच्या कुमुद जोशी. त्या एकट्याच राहतात, कुटुंबातही कोणी नाही त्यामुळे वाढदिवसाबाबत काही त्यांना उत्साह नव्हता. पण मुंबई पोलिसांनी सरप्राइज दिलं आणि कुमुद जोशी यांनी एक अविस्मरणीय वाढदिवस साजरा केला. 13 जुलै रोजी मुंबई पोलीस केक घेऊन थेट कुमुद जोशी यांच्या घरी पोहोचले. केवळ त्यांना एकटेपण वाटू नये आणि वाढदिवस खास ठरावा याच्यासाठी मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचललं.

13 जुलैच्या संध्याकाळीच मुंबई पोलिसांनी या खास वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो ट्विटरद्वारे शेअर केले. यासोबत, ’77 वर्षांच्या कुमुद जोशी या खार परिसरात एकट्या राहतात. पण, त्यांना एकटेपणा वाटू नये याची खार पोलीस स्थानकातील काळजी घेतली आणि त्यांचा जन्मदिन खास बनविण्याचा प्रयत्न केला. तुम्हीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात. यासाठी #HBDKumudji या हॅशटॅगचा वापर करुन संदेश पाठवा, तुमच्या शुभेच्छा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. पोलिसांच्या या ट्विटनंतर लगेचच नेटकऱ्यांनीही प्रतिसाद देत भरपूर शुभेच्छा कुमुद जोशी यांना पाठवल्या.

मुंबई पोलीस अशाप्रकारे सरप्राइज देण्यासाठी लोकप्रिय आहेत. 2017साली ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलिसांनी एका तक्रारदाराचा वाढदिवस पोलीस स्थानकातच साजरा केला होता. हरवलेल्या गोष्टीबद्दल तक्रार करण्यासाठी एक तरुण पोलीस स्थानकात गेला असता चौकशी दरम्यान त्यादिवशी त्याचा वाढदिवस असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी चक्क केक ऑर्डर करुन त्या तक्रारदाराचा वाढदिवस पोलीस स्थानकातच साजरा केला होता. याचवर्षी माटुंगा पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांनी एकट्याच राहणाऱ्या 85 वर्षीय ललिता सुब्रमण्यम यांचा वाढदिवसही मोठ्या थाटात साजरा केला होता.