ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना हसवत, खोचक टोमणे मारत किंवा मार्मिक पद्धतीने एखाद्या विषयाचं गांभीर्य पटवून देण्याचं काम नागपूर पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन सातत्याने होत असतं. भारत सरकारने चीनविरोधात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय पबजी गेमसोबतच ११८ चिनी अॅप्सवर बंदी घातली. यातील पबजी गेम तरुणाईमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे, हाच धागा पकडत नागपूर पोलिसांनी पबजी गेमबाबत एक भन्नाट ट्विट केलं असून त्याद्वारेही तरुणाईमध्ये जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला आहे.

“आता Pochinki ला भेट द्यायची नाही….घरीच राहा, सुरक्षित राहा” असं ट्विट नागपूर पोलिसांनी केलं आहे. या ट्विटमध्ये Pochinki ला भेट द्यायची नाही असं म्हणत नागपूर पोलिसांनी पबजी खेळणाऱ्या तरुणाईला टोला मारला आहे. पबजी खेळणाऱ्यांमध्ये Pochinki या ठिकाणाचं वेगळं महत्त्व आहे. हा गेम खेळणाऱ्यांमध्ये Pochinki मध्ये उतरण्यावरुन किंवा Pochinki ला जाण्यावरुन वेगळी चढाओढ असते. Pochinki म्हणजे सर्वाधिक शत्रू असलेलं ठिकाण, जास्त Kill करण्यासाठी किंवा सर्व शस्त्र पटकन मिळवण्यासाठी पबजी खेळणाऱ्यांचा Pochinki मध्ये उतरण्याकडे सर्वाधिक कल असतो. पण आता बॅन झाल्याने युजर्सना पबजी खेळता येणार नाहीये. त्यावरुनच टोमणा मारताना नागपूर पोलिसांनी “आता Pochinki ला भेट द्यायची नाही….घरीच राहा, सुरक्षित राहा” असं ट्विट केलं आहे. नेटकऱ्यांच्याही नागपूर पोलिसांचं हे ट्विट चांगलंच पसंतीस पडलंय. तर, काही जणांनी मात्र त्या ट्विटवर रिप्लाय देताना गेम बॅन झाल्याबद्दल दुःख व्यक्त केलंय. ‘तुम्ही तर आमच्या जखमेवर मीठ चोळायला थोडीफार वाटही नाही बघितली’, असं ट्विट एका युजरने केलंय. तर, ‘आता अश्रू अनावर झालेत…मनापासून खूप वाईट वाटतंय….’ अशा आशयाचे मिम्स काही नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहेत. अन्य एका ट्विटर युजरने, “मी तर पबजी खेळतानाही घरातच लपून बसायचो” असं मजेशीर ट्विट केलं आहे.


मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरात करोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे.  असे असतानाही अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न होत आहे.