अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एका जोडप्याला समुद्रकिनारी वेडिंग फोटोशूट करणे खूपच महागात पडलं. किनाऱ्यापासून काही मीटर आतमध्ये असणाऱ्या खडकांवर उभं राहून हे दोघे आपले फोटो काढून घेत होते. ख्रिश्चन पद्धतीचा लग्नाचा पारंपारिक पेहराव त्यांनी केला होता. नवरा मुलगा हा सुटाबुटात होता तर नवरीने लांबलचक गाऊन घातलेला. मात्र फोटोशूट सुरु असतानाच अचानक एक मोठी लाट आली आणि दोघांना समुद्रात खेचून घेऊन गेली. समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या लाइफ गार्ड्सने प्रसंगावधान दाखवत वेळेत समुद्रात उडी मारत दोघांनाही बाहेर काढल्याने सुदैवाने दोघांचेही प्राण वाचले. हा सर्व घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.

थोड्यात जीव वाचलेल्या या जोडप्याच्या वेडिंग शूटचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ही घटना कॅलिफोर्नियामधील ट्रेजर समुद्रकिनारी घडली. या दोघांनी समुद्रकिनारी अनेक फोटो काढले. मात्र तिथून परतताना त्यांना समुद्रातील खडकांवर उभं राहून फोटो काढण्याची इच्छा होती. दोघे खडकावर गेले. त्यांनी काही फोटो काढले मात्र तितक्यात मोठ्या आकाराच्या लाटा खडकाला धडकू लागल्या आणि अशाच एका लाटेने दोघांनाही समुद्रात खेचलं.

काही कळण्याच्या आतच हे दोघे पाण्याचा जोर भरपूर असल्याने समुद्रात बऱ्याच आतपर्यंत खेचले गेले. मात्र घडलेल्या प्रकार लक्षात आल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील लाइफ गार्ड्सने तातडीने या दोघांच्या मदतीसाठी समुद्रात उड्या घेतल्या आणि त्यांना बाहेर काढले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन लाइफ गार्ड या जोडप्याला समुद्रामधून बाहेर काढताना दिसत आहेत. समुद्राच्या लाटांमुळे थेट खडकावर आदळल्याने नवऱ्या मुलाला चांगलाच मार लागल्याची माहिती समोर आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर हा समुद्रकिनारा मागील दोन महिन्यांपासून बंद होता. ४ जुलै रोजी तो पुन्हा सुरु करण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने लोक येऊ लागल्याने पोलीस यंत्रणेवरही ताण पडत असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.